
कोरोनामुळे यंदा नोव्हेंबरअखेरपर्यंत शाळेची घंटा वाजलीच नाही. त्यामुळे यंदाचे वर्ष वाया जाणार की काय ही भीती विद्यार्थी व पालकांना असतानाच राज्यात कोरोना नसलेल्या काही भागांत २३ नोव्हेंबरला माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या.
सोनगीर (धुळे) : राज्यात बहुतांश शाळांत नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले, तर काही शाळा कोरोनामुळे सुरू होऊ शकल्या नाहीत. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा अद्यापही फारसा प्रतिसाद नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले असले तरी ते किती पचनी पडले हा प्रश्नच आहे. ग्रामीण भागात तर दयनीय अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या बोर्डाचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरवात झाली असून, परीक्षा नेमकी कधी, किती गुणांची, किती अभ्यासक्रमावर आधारित राहील, याबाबत विद्यार्थी, पालक तथा शिक्षकांमध्येही संभ्रमावस्था आहे.
कोरोनामुळे यंदा नोव्हेंबरअखेरपर्यंत शाळेची घंटा वाजलीच नाही. त्यामुळे यंदाचे वर्ष वाया जाणार की काय ही भीती विद्यार्थी व पालकांना असतानाच राज्यात कोरोना नसलेल्या काही भागांत २३ नोव्हेंबरला माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या. नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. खानदेशात तीनशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या माध्यमिक शाळा ८ डिसेंबरला सुरू झाल्या. त्याच दिवशी धुळे जिल्ह्यात ४२१ पैकी ३४४ माध्यमिक शाळा सुरू झाल्या. उर्वरितांपैकी काही शाळा १५ डिसेंबरपासून सुरू झाल्या, तर काही गावांत कोरोना रुग्ण सापडल्याने तेथील शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत.
विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नाही
दरम्यान, नववी ते बारावीचे वर्ग सुरू असलेल्या शाळेतही विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद नाही. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण फारसे प्रभावी ठरले नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात विशेषतः खेडे किंवा आदिवासी भागात ऑनलाइन शिक्षण किती विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक घेतले, हा संशोधनाचा विषय आहे. अशातच दहावी व बारावीचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. मात्र, परीक्षांसाठी अभ्यासक्रम किती कमी होईल? परीक्षा पूर्ण तीन तासांची की वेळ कमी करणार? वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या वाढेल किंवा कसे? विशेष म्हणजे परीक्षा कधी होईल, असे प्रश्न आहेत. यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्ग संभ्रमात आहे.
संपादन ः राजेश सोनवणे