धुळे जिल्‍ह्यात अवघा ४१ टक्‍केच पाणीसाठा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 April 2021

सहा गावांत टँकरने पाणीपुरवठ्याची शक्‍यता असून, तीन लाख ३० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. संभाव्य पाणीटंचाई एप्रिल, मेमध्ये होण्याची शक्यता आहे.

सोनगीर (धुळे) : कडक उन्हामुळे जिल्ह्यातील धरणे व तलावात अवघे ४१ टक्के पाणी असले तरी अद्याप कुठेही पाणीटंचाई नाही. मात्र एप्रिल ते जूनदरम्यान जिल्ह्यातील ७२ गावे व ३० वाड्यांना संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. त्यासाठी १०२ योजना प्रस्तावित असून, ४३ लाख ४४ हजार रुपये संभाव्य खर्च अपेक्षित आहे. सर्व गावे व वाड्यांना खासगी विहिरी अधिग्रहणाची शक्यता आहे. 
साक्री तालुक्यात सर्वाधिक २४ गावे व २३ वाड्यांना या तीन महिन्यांत संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. धुळे तालुक्यातील १४२ गावांतील १२४ ग्रामपंचायतींपैकी १२ गावांना संभाव्य पाणीटंचाई जाणवू शकते. जिल्ह्यात एकही मोठी पाणीयोजना प्रस्तावित नाही. 

४० लाखाचा खर्च प्रस्‍तावित
धुळे तालुक्यात १२ गावे, साक्री तालुक्यात २४ गावे व २३ वाड्या, शिरपूर तालुक्यात १८ गावे व सहा वाड्या, शिंदखेडा तालुक्यात १८ गावे व एक वाडी आदी गावे संभाव्य पाणीटंचाईच्या यादीत समाविष्ट असून, त्यासाठी खासगी विहिरी अधिग्रहीत करण्याची शक्यता आहे. त्यासाठी ४० लाख १४ हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे. सहा गावांत टँकरने पाणीपुरवठ्याची शक्‍यता असून, तीन लाख ३० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. संभाव्य पाणीटंचाई एप्रिल, मेमध्ये होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news water lavel down dhule district only 41 parsantage water is stored