महिलाच स्ट्राँग..अंत्‍यसंस्‍काराला कोणी नाही तिथे तीची डेअरींग; पुरुषांपेक्षा बाधितांचे प्रमाण कमी

womens day
womens day

धुळे : वर्षभरापासून कोविड-१९ या विषाणूने जगभरातील मानवजातीला जेरीस आणले आहे. या संकटाच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यापुरता विचार केला, तर जिल्ह्यात एकूण १६ हजार ६९३ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली, तर आत्तापर्यंत ३९२ बळीही गेले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण साधारण ६० टक्के, तर महिलांचे प्रमाण ४० टक्के आहे. वेगळ्या अंगाने याचा विचार केला, तर कोरोनाच्या या महाभयानक संकटातही पुरुषांच्या तुलनेत महिलाच अधिक ‘स्ट्रॉँग’ असल्याचे चित्र पाहायला मिळते. 
जगावर कोरोनाचे संकट येऊन आता वर्ष झाले आहे. या वर्षभरात कोरोना विषाणूने अक्षरशः कहर माजवला आहे. या संकटाने संपूर्ण मानवजात हैराण आहे. धुळे जिल्ह्यापुरता विचार केला, तर १० एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण समोर आला होता. त्यानंतर मात्र या विषाणूने धुळे शहरासह संपूर्ण जिल्हाभरात पाय परसले व सद्यःस्थितीत हे पाय घट्ट रोवले आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. 

संकट कोणतेही कसरत महिलांचीच
कोरोनाच्या या संकटाने समाजातील गरीब, श्रीमंत अशा दोन्ही घटकांना फटका बसला. त्यातही आर्थिकदृष्ट्या गरीब वर्गाचे अक्षरशः कंबरडे मोडले. अर्थात, समाजातील कोणत्याही घटकावर कोणतेही संकट कोसळले तरी त्याचा सामना करण्यासाठी सर्वाधिक कसरत ही महिलांचीच होते. कोरोनाच्या संकटातही महिलांना ती करावी लागली, करावी लागत आहे. अर्थात, कुटुंबात कुणाला कोरोनाची लागण झाली, कुणाचा बळी गेला, तर त्याची सर्वांत जास्त झळ त्या- त्या घरातील महिलांनाच अधिक सोसावी लागली. मात्र, निसर्गदत्त देणगी असलेली ही माउली कोरोनाच्या संकटाशीही तेवढ्याच ताकदीने लढताना दिसत आहे. 

पुरुषांच्या तुलनेत बाधा कमीच 
जिल्ह्याभरात एकूण १६ हजार ६९३ जणांना आत्तापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. या बाधितांमध्ये पुरुष किती व महिला किती याची निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नसली तरी पुरुषांचे प्रमाण साधारण ६० टक्के, तर महिलांचे प्रमाण ४० टक्के असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. अर्थात, कोरोनाचा मुकाबला करण्यात महिला अधिक सरस ठरल्याचे पाहायला मिळते. 

प्रतिकारशक्तीसह इतर कारणे 
महिलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती पुरुषांच्या तुलनेत अधिक मानली जाते. कोणत्याही परिस्थितीत व वातावरणात महिला ॲडजस्ट होतात. महिलांमधील या रोगप्रतिकारक शक्तीनेच त्यांना कोरोनाशी लढण्याचे बळ दिल्याचे मानले जाते. याशिवाय महिलांचे घराबाहेर न पडणे हेही एक प्रमुख कारण मानले जाते. अर्थात, कोरोना संसर्गाच्या काळात महिलांचा थेट संपर्क बाहेरच्या वातावरणाशी, बाधित व्यक्तींशी न आल्याने त्या कोरोनापासून दूर राहिल्या. 

‘ती’ने डेअरिंगही केली 
सुरवातीच्या काळात कोरोनामुळे कुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही कुटुंबातील सदस्यही पुढे येत नसल्याचे चित्र होते. एका मुलाने तर आपल्या बापाचा अंत्यसंस्कार शासकीय यंत्रणेने करावा त्याला माझी काहीही हरकत नसल्याचे लेखी दिल्याचेही पाहायला मिळाले. अशा संकटात धुळे शहरात एका सुनेने आपल्या सासऱ्याच्या व एका मुलीने आपल्या आईला अग्निडाग दिला होता. 

कोरोनामुळे बाधित अथवा बळींमध्ये पुरुष किती आणि महिला किती, याची निश्‍चित आकडेवारी आता उपलब्ध नाही. सुरवातीच्या काळात तसा डाटा जमा करत होतो, तो डाटा व त्यानंतरचे निरीक्षण पाहता बाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण ६० टक्के, तर महिलांचे प्रमाण ४० टक्के आहे. महिलांमध्ये निसर्गतः असलेली इम्युनिटी पॉवर तसेच त्यांना एक्सपोजर नसणे अर्थात, त्यांचे घराबाहेर न पडणे अशी काही कारणे त्यामागे आहेत. 
-डॉ. विशाल पाटील, नोडल अधिकारी, धुळ जिल्हा 

संपादन ः राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com