पंगतीची तयारी सुरू असताना हुंडा मागून मोडले लग्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

मंगल कार्यालये दाखविल्यानंतर लॉन बुक करण्यात आले. तत्पूर्वी मुलगा चेतन याने मुलीसोबत फिरण्यासही सुरवात केली. लग्नाला काही दिवस शिल्लक असताना मात्र मुलाच्या आईने शिरसोली येथे येऊन चक्क 11 लाख रुपये हुंड्याची मागणी केली

ळगाव : स्थळ पाहण्याचा कार्यक्रम झाला, साखरपुडा होऊन लग्नही ठरले. मात्र, लग्न ठरल्यानंतर हुंड्यात अकरा लाखांची मागणी केली. वधूपक्षाने एवढी रक्कम देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर लग्नाची तयारी झालेली असताना वर पक्षाने थेट लग्नास नकार दिला. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीनंतर भारतीय वायूदलातील जवानाविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिरसोली येथील अभियांत्रिकी विद्याशाखेतून (बी.ई.) पदवी संपादन केलेल्या प्रियांका (काल्पनिक नाव) तरुणी ही वडील, आई, भाऊ यांच्यासह वास्तव्यास आहे. तिचे बी.टेक.चे शिक्षण पूर्ण झालेले आहे. गेल्या वर्षी कुटुंबीयांनी तरुणीच्या होकारानुसार स्थळ पाहण्यास सुरवात केली. नातेवाईक अशोक बडगुजर यांनी तरुणीच्या वडिलांना ग्वालियर येथे वायुदलात नोकरीला असलेल्या चेतन दिलीप बडगुजर (रा.बडोदा गुजरात) यांचे स्थळ सुचवले. दोन्ही कुटुंबीयांसह मुला-मुलीच्या पसंतीनंतर 27 जुलैस साखरपुडा पार पडला. लग्न सोहळा थाटात करण्याची इच्छा मुलाच्या आईने व्यक्त केल्याने त्यांच्या मागणीनुसार शहरातील सर्व मंगल कार्यालये दाखविल्यानंतर लॉन बुक करण्यात आले. तत्पूर्वी मुलगा चेतन याने मुलीसोबत फिरण्यासही सुरवात केली. लग्नाला काही दिवस शिल्लक असताना मात्र मुलाच्या आईने शिरसोली येथे येऊन चक्क 11 लाख रुपये हुंड्याची मागणी केली. लग्नाला काहीच दिवस शिल्लक असताना इतकी रक्‍कम देणे अशक्‍य असल्याचे कुटुंबीयांनी सांगितल्यावर लग्न मोडण्यात आले. 

विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा 
पीडित तरुणीने लग्न मोडू नये, यासाठी चेतनला फोन केला. मात्र त्यानेही मी सरकारी नोकरीस असून तुम्हाला 11 लाख रुपयेच द्यावे लागतील, नाहीतर लग्न मोडले असे समजा, असे सांगून नकार दिला. यानंतर नातेवाईक, मध्यस्थीमार्फत मुलीच्या कुटुंबीयांनी चेतनसह त्याची आई दोन्ही बहिणींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी शेवटी लग्न रद्द करून विश्‍वासघात तसेच फसवणूक केली. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून तरुण चेतन बडगुजरसह त्याची आई कल्पना दिलीप बडगुजर, बहीण आरती महेंद्र बडगुजर, कुसुम अरविंद बडगुजर (दोन्ही रा. कल्याण) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक विशाल सोनवणे तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news Broke marrige Hunda boy and mother arrest