esakal | रेमडेसिव्हरच्या साठेबाजीसह नफेखोरी केल्यास कारवाई; भरारी पथकाची नियुक्ती 

बोलून बातमी शोधा

remediation stock

नातेवाईकांकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, विहित नमुन्यातील प्रमाणपत्र, रुग्णाचे आधारकार्ड असल्याची खात्री करूनच विक्री केली जाते किंवा कसे यावरही पथकातील सदस्य निगराणी ठेवतील. 

रेमडेसिव्हरच्या साठेबाजीसह नफेखोरी केल्यास कारवाई; भरारी पथकाची नियुक्ती 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : कोरोना विषाणूबाधित रुग्णांवरील उपचारासाठी असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी तसेच त्याचा काळाबाजार, साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी हा निर्णय घेतला. संबंधित पथक शहरासह जिल्ह्यात सर्रास सुरू असलेला काळा बाजार रोखण्यास यशस्वी ठरते का याकडे सर्वांचे लक्ष असेल. 
उपजिल्हाधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई (भूसंपादन) या पथकप्रमुख आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त महेश देशपांडे, पोलिस उपअधीक्षक प्रदीप पाडवी (मो. ७९७२४ २८७१९), आनंदखेडा आरोग्य केंद्राचे डॉ. निखिल शिंदे (९४२०७ ३८२८८) सदस्य आहेत. रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होणे, त्याचा काळाबाजार व साठेबाजी रोखणे, विक्री, वितरण व वापरावर भरारी पथकातील सदस्य नियंत्रण ठेवतील. रुग्णालयांमधील एकूण कोविड रुग्णांची संख्या व सध्या रुग्णालयाच्या औषधे विक्री दुकानात उपलब्ध असणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या साठ्यावर दैनंदिन नियंत्रण ठेवणे, इंजेक्शनच्या खरेदीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, विहित नमुन्यातील प्रमाणपत्र, रुग्णाचे आधारकार्ड असल्याची खात्री करूनच विक्री केली जाते किंवा कसे यावरही पथकातील सदस्य निगराणी ठेवतील. 

तर गुन्‍हे दाखल करणार
रेमडेसिव्हर इंजेक्शनची साठेबाजी, नफेखोरी सुरू असल्याचे निदर्शनास येतील, अशी औषध दुकाने व संबंधित व्यक्ती यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यादव यांनी दिले आहेत. रेमडेसिव्हर इंजेक्शनची साठेबाजी किंवा नफेखोरी सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी भरारी पथकातील सदस्यांकडे तक्रार नोंदवावी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात (दूरध्वनी क्रमांक : ०२५६२ - २८८०६६) संपर्क साधावा, असेही आवाहन आहे. 
 
नियंत्रणाची शिवसेनेची मागणी : माळी 
तुटवड्यासह धुळ्यात अनेक ठिकाणी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. तो रोखण्यासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनची विक्री औषध दुकानातून बंद करून थेट रुग्णालयात रुग्णाला दिले जाईल, अशी उपाययोजना करावी, असे सांगत अनियंत्रित वापर, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भरारी पथकाची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे महानगरप्रमुख ललित गंगाधर माळी यांनी शासनासह जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 

संपादन- राजेश सोनवणे