esakal | २४१ बालकांना मिळाले पालकांचे छत्र 
sakal

बोलून बातमी शोधा

child parents' umbrella

अपहृत, हरविलेले, भिक्षा मागणारे, कचरा गोळा करणारे व समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात येते.

२४१ बालकांना मिळाले पालकांचे छत्र 

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : अपहृत, हरविलेले, भिक्षा मागणारे, कचरा गोळा करणारे तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांकडे किंवा बालसंरक्षण गृहाकडे सुपूर्द करण्यासाठी जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान दर वर्षी राबविण्यात येते. या वर्षी १ ते ३१ डिसेंबरदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतर्गत ही मोहीम राबविण्यात येत असून, आतापर्यंत आठ मोहिमा पूर्ण झाल्या आहेत. त्यात २४१ बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. 

शासनाची दर वर्षी मोहीम 
महाराष्ट्रात २०१४ पासून ऑपरेशन मुस्कान मोहीम १ ते ३१ जुलैदरम्यान राबविण्यात येते. संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेंतर्गत अपहृत, हरविलेले, भिक्षा मागणारे, कचरा गोळा करणारे व समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात येते. त्यानुसार अद्यापपावेतो आठ मोहिमा राबविण्यात आल्या. हजारो बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न राज्यासह नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने केला आहे. 

ऑपरेशन मुस्कान पथक 
मुस्कनची नववी मोहीम १ ते ३१ डिसेंबरदरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यात प्रत्येक पोलिस ठाण्यातून एक अधिकारी व चार अंमलदारांचे स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. शिवाय जिल्हा बालकल्याण समिती, जिल्ह्यातील बालसंरक्षण गृहे, बालकांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्था व बालपोलिस पथकातील अधिकारी, अंमलदारांचा मोहिमेत सहभाग आहे. या सर्व घटकांची जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात समन्वय बैठक घेऊन ऑपरेशन मुस्कान प्रभावीपणे राबविण्यासाठी रूपरेषा ठरविण्यात आली. 

घर सोडलेले व हरविलेले परतले घरी 
मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील वेगवेगळे रेल्वेस्थानक, बसस्थानक, धार्मिक स्थळे, हॉटेल, ढाबे या ठिकाणी काम करणारी बालके, भिक्षा मागणाऱ्या व कचरा गोळा करणाऱ्या बालकांचा शोध घेतला जात आहे. यात अद्यापपावेतो संपूर्ण कारवाईत अपहृत तीन, हरविलेले २५ व्यक्ती, बालकामगार म्हणून काम करीत असलेल्या सुमारे २४१ मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात जिल्हा पोलिस दलाला यश आले आहे. 

अधिकाऱ्यांचे विशेष प्रयत्न 
ऑपरेशन मुस्कान-९ ही मोहीम पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या समन्वयातून सर्व पोलिस ठाणे, प्रभारी अधिकारी, विशेष पथकातील अधिकारी, अंमलदारांच्या सहभागातून राबविण्यात येत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image