esakal | धान्य साठवणूकीसाठी उत्‍तम पर्याय; बांबूपासून तयार होणारी कणगी, आदिवासींच्या उद्योगाला चालना

बोलून बातमी शोधा

bambu kangi}

धान्य टिकवण्यासाठी कोठी, संदूक, मोठे माठ किंवा पिप वापरतात. यासोबतच धान्य साठविण्याची पारंपारीक काळातील ‘कणगी’ ही उत्‍तम पर्याय ठरते. आजच्या स्‍थितीला धान्यावर बोरिक पावडर, कडुनिंबाचा पाला, चुन्याची निवळी, खडे मीठ यांचे टाकले जातात. यामुळे किडे, मुंग्यांपासून संरक्षण मिळते. पण बांबूपासून बनणाऱ्या कणगी तयारी करण्याची परंपरा आदिवासी बांधवांची असून, त्‍याच्या उद्योगाला देखील आता चालना मिळू लागली आहे.

धान्य साठवणूकीसाठी उत्‍तम पर्याय; बांबूपासून तयार होणारी कणगी, आदिवासींच्या उद्योगाला चालना
sakal_logo
By
जसपाल वळवी

वाण्याविहिर (नंदुरबार) : अतिदुर्गम सातपुडा पर्वत रांगातील मोलगी परिसरातील शेतकऱ्यांना बांबूपासून तयार होणाऱ्या धान्य साठवून ठेवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या कणगी तयार करण्याचा उद्योग-व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहे 

धान्य शेतातून कापणी केल्यानंतर ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत त्याची गुणवत्ता कायम ठेवणे खुप जिकरीचे असते. शेतकरी धान्य साठविण्यासाठी बांबूच्या किंवा वेताच्या टोपलीला बाहेरून शेण किंवा मातीचा थर लावतो. त्यामुळे त्‍याचे छिद्रे बंद होतात व थराच्या वासामुळे बाहेरून येणाऱ्या किड्यांपासून धान्याचे संरक्षण होते. यातील एक प्रकार म्‍हणजे बांबूपासून बनणारी कणगी.

‘कणगी’चा आधार
सातपुडा पर्वतरांगांत राहणाऱ्या आदिवासी बांधवांना पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यात स्थलांतर करणे हा या भागातील खूप मोठा प्रश्न असला तरी मोलगी परिसरातील काही गावामधील शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त जोड व्यवसाय म्हणून कणगी व्यवसायाचा आधार आहे. परिसरातील बालाघाट, देवबारी, खोडजबार, दुधलीपादर, जुगलखेत, बोरीखासाड बिजरीगव्हाण, बर्डी या भागात ‘कणगी’ (धान्य साठवून ठेवण्याची बांबूपासून तयार करण्यात येणारी कोठी) व्यवसायासाठी तयार केल्या जातात आणि शेतकऱ्यांना मोलगी हे बाजारपेठ विक्रीसाठी खूप चांगले असल्यामुळे त्याची विक्री ही चार ते पाच हजार रुपयापर्यंत होते.

पंचवीस वर्ष धान्य टिकते
कणगीचा उपयोग आदिवासी बांधव पूर्वीपासून आपले धान्य साठवून ठेवण्यासाठी करतात. यामध्ये शेतकरी 20 ते 25 वर्षापर्यंतचे धान्य साठवून ठेवू शकतो. आजही आदिवासी भागात खूप जुन्या कणग्या शेतकऱ्यांनी आपल्या माळ्यावर ठेवलेल्या आढळतात. आदिवासी बहुल भागात जंगलतोड झाली असली तरी आता या भागातील लोकांनी जंगलाचे महत्व जाणून त्यांनी आपल्या शेताच्या बांध्यावर व रिकाम्या जागेवर मोठ्या प्रमाणावर झाडे व बांबू लागवड केल्याने या बांबूचा उपयोग आता त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी होत आहे.

जोड व्यवसायाने स्‍थलांतर कमी
शेती पूरक व्यवसाय म्हणून कुकुटपालन, शेळीपालन या व्यवसायाबरोबरच आता कणगी व्यवसाय ही उदयास येत आहे. शेतकरी प्रामुख्याने कणगी, टोपल्या, झाडू, घरासाठी, शेतीसाठी लागणारी विविध अवजारे ही बांबूपासून बनवतात. त्यामुळे बांबूपासून तयार होणारा कणगी व्यवसाय हा या भागातील शेतकऱ्यांसाठी आधार ठरत आहे. अशा लहानमोठ्या व्यवसायामुळे या भागातील होणारे स्थलांतर बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे