esakal | जिल्‍हाधिकाऱ्यांनी घेतला तास; कॉलेज जीवनातील आठवणीतून शिक्षणाचा मंत्र

बोलून बातमी शोधा

collector rajendra bharud}

जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी वैद्यकीय महाविद्यालय परिसरात प्रवेश करताच सर्व औपचारिकता बाजूला सारून सरळ वर्गात प्रवेश केला.

जिल्‍हाधिकाऱ्यांनी घेतला तास; कॉलेज जीवनातील आठवणीतून शिक्षणाचा मंत्र
sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर..दारातच विद्यार्थ्यांनी छान रांगोळी काढलेली. जिल्हाधिकारी येणार म्हणून स्वागताची तयारी होती, वरिष्ठ अधिकारी येणार म्हणून विद्यार्थी शिस्तीने बसलेले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी संवाद साधण्यास सुरुवात करताच विद्यार्थ्यांचे चेहरे खुलले. डॉ. भारुड यांच्या तासाला विद्यार्थी रमले आणि पुढचा तास वैद्यकीय विषयावर घेण्याचे आश्वासन देऊन तास संपला. 

जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी वैद्यकीय महाविद्यालय परिसरात प्रवेश करताच सर्व औपचारिकता बाजूला सारून सरळ वर्गात प्रवेश केला. कॉलेज जीवनातील आठवणी सांगून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात करताना केवळ वर्गात बसण्याने किंवा पुस्तक वाचण्याने शिक्षण मिळत नाही, तर विद्यार्थ्याच्या मनात शिक्षण मिळविण्याची तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हाच खऱ्या अर्थाने शिक्षणास सुरुवात होते, असे त्यांनी सांगितले. आजच्या तासाला वेगळे काहीतरी मिळणार म्हणून विद्यार्थीदेखील एकाग्रतेने या संवादात सहभागी झाले. 

तक्रार न करता परिश्रमाची तयारी ठेवा
सकारात्मक विचार करून कठोर परिश्रमाची तयारी ठेवा. आपले कुटुंब आणि परिसरातील नागरिकांना अभिमान वाटेल असे सर्वोत्तम डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पायाभूत सुविधांचा वाटा 10 टक्के आणि त्यांनी केलेल्या निश्चयाचा वाटा 90 टक्के असतो. स्पर्धेत सहभागी अनेक विद्यार्थ्यांमधून वैद्यकीय शिक्षणासाठी आपली निवड झाल्याने कोणतीही तक्रार न करता विद्यार्थ्यांनी परिश्रमाची तयारी ठेवावी. दररोज कठीण शब्दांचा अभ्यास करण्याची सवय उपयुक्त ठरते अशा प्रेरक विचारांनी हा तास रंगला. 

भारूड सरांच्या तासाला विद्यार्थीही रमले
डॉ.भारुड सरांच्या या तासाला विद्यार्थ्यांचे चेहरेही खुलले होते. त्यांच्या विषयातील संकल्पना सांगून त्यासाठी अभ्यास कसा आवश्यक आहे हे त्यांनी सोप्या शब्दात सांगितले. 4.5 कोटी रुपये खर्च करून सुसज्ज ग्रंथालय शहरात उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा एकाच ठिकाणी होतील असा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रशासनातर्फे वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्व आवश्यक सुविधा देण्यात येतील अशी ग्वाही विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. 

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी, खासदार डॉ.हिना गावित, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील सहकाऱ्यांमुळे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याचेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. त्यांनी विद्यार्थिनी वसतिगृह आणि परिसराची पाहणी केली. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी महाविद्यालयातील सुविधांची माहिती दिली. यावेळी प्रा. डॉ. गिरीष ठाकरे, समन्वयक अधिकारी डॉ. प्रवीण ठाकरे, डॉ. आनंद जामकर आदी उपस्थित होते

संपादन ः राजेश सोनवणे