लॉकडाउन नाही, पण नियमांचे पालन आवश्‍यक अन्यथा..

धनराज माळी
Monday, 22 February 2021

कोरोनाचा प्रसार अधिक असलेल्या जिल्ह्यातून विवाहासाठी पाहुणे मंडळी येत असल्यास खबरदारी घ्यावी. नियमांचे पालन न केल्यास आयोजक, लॉन्स किंवा मंगल कार्यालयाच्या मालकाविरोधात कारवाई करण्यात येईल. 

नंदुरबार : जिल्ह्यात ‘लॉकडाउन’बाबत कोणतेही निर्देश दिलेले नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये; मात्र कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे. 
लॉकडाउनमुळे जिल्ह्याच्या अर्थचक्रावर परिणाम होत असल्याने शासनाकडून निर्देश येईपर्यंत त्याची अंमलबजावणी होणार नाही. तथापि नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. व्यावसायिकांनी स्वतः नियमांचे पालन करण्यासोबत ग्राहकांनाही सूचना द्याव्यात. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे. जिल्ह्यात विवाह सोहळे, सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमात शासनाने दिलेल्या मर्यादेच्या आतच उपस्थिती राहील याची दक्षता घ्यावी. विशेषतः कोरोनाचा प्रसार अधिक असलेल्या जिल्ह्यातून विवाहासाठी पाहुणे मंडळी येत असल्यास खबरदारी घ्यावी. नियमांचे पालन न केल्यास आयोजक, लॉन्स किंवा मंगल कार्यालयाच्या मालकाविरोधात कारवाई करण्यात येईल. 

काय म्‍हणाले जिल्‍हाधिकारी
प्रशासनाने गृह विलगीकरण बंद केल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे. तरीही राज्यातील इतर काही जिल्ह्यांत ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने दक्षता घेण्याची गरज आहे. नागरिकांनी सतत हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, शारीरिक अंतर राखणे आणि मास्कचा वापराविषयी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. प्रशासनास सहकार्य केल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. 

तर लग्‍नसोहळे अन्‌ दुकानदारांवरही कारवाई
नंदुरबार, शहादा शहरात कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात असल्याने महसूल, पोलिस, नगरपालिका यांचे एकत्रित पथक तयार करून विवाह सोहळ्याच्या ठिकाणी भेट द्यावी आणि ५० पेक्षा अधिक नागरिक दिसून आल्यास कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दुकान आणि बाजारात मास्क न घालणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करावी. अशाच स्वरूपाच्या कारवाईसाठी बस आणि रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी बैठे पथक नियुक्त करावे, असे त्यांनी सांगितले. दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके उपस्थित होते. 
 
ग्रामीण भागात अधिक तपासणी 
श्री. गावडे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी असली तरी विभागातील इतर जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यादृष्टीने ग्रामीण भागात अधिक तपासणी करण्यावर भर देण्यात येईल. बैठकीला जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news collector rajendra bharud meet coronavirus lockdown