esakal | पोस्ट, बँका पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

bank and post office

पोस्ट, बँका पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नंदुरबार : जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत (Break the chain) कडक निर्बंध लावलेले असताना खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना (Farmer) बी-बियाणे, अवजारे खरेदी, इतर व्यवहार करणे सुलभ व्हावे यासाठी तसेच खावटी व इतर योजनेंतर्गत अनुदान वाटपासाठी जिल्ह्यातील सर्व पोस्ट कार्यालये व बँका शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड (Nandurbar collector Rajendra Bharud) यांनी परवानगी दिली आहे. (nandurbar collector rajendra bharud post allowing banks to start at full capacity)

सर्व बँका व पोस्ट ऑफिस नियमित वेळेत व १०० टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील, मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नेमावा. शाखेमध्ये एका वेळेस फक्त पाच ग्राहकांना प्रवेश दिला जाईल. बँक आणि पोस्ट कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच ग्राहकांनी कोविड-१९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक कार्यप्रणालीचा अवलंब करणे बंधनकारक राहील. यामध्ये शारीरिक अंतर ठेवणे, चेहऱ्यावर मास्क लावणे, हात सॅनिटाइझ करणे आदी बाबींचा समावेश आहे. ग्राहकांनी अत्यावश्यक काम असेल तरच बॅंकेच्या शाखेमध्ये यावे. सर्दी, ताप, खोकला इत्यादीचा त्रास असलेल्या ग्राहकांनी बॅंकेत येणे टाळावे. याबाबत बँकेत दर्शनी भागावर सूचनाफलक लावावा.

हेही वाचा: उसाच्या शेतात आढळला तरूणीचा मृतदेह; खुनाचे कारण अस्पष्‍ट

बँक, पोस्‍टात आल्‍यावर याचे पालन आवश्‍यक

ग्राहकांनी बँकेच्या काउंटरपासून तीन ते पाच फुटांचे अंतर ठेवावे. पोस्ट व बँकांमध्ये एका काउंटरवर एका वेळी एकच ग्राहक हजर राहील याची दक्षता घ्यावी, उर्वरित ग्राहकांना पोस्ट ऑफिस/बँकेच्या बाहेर दोन ते तीन फुटांच्या अंतरावर थांबण्याची व्यवस्था करावी. पोस्ट ऑफिस व बँकेच्या एटीएममध्ये एकावेळी एकच ग्राहक प्रवेश करेल व उर्वरित ग्राहकांना दोन ते तीन फूट अंतरावर थांबण्यास सांगावे. एटीएम मशिनचे दररोज निर्जंतुकीकरण करावे. सर्व बँकांनी आपापल्या शाखेतील एटीएम, कॅश/चेक डिपॉझिट मशिन, पासबुक प्रिंटर्स व शाखेतील उपकरणे यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.

ऑनलाईन व्‍यवहारासाठी करावे प्रेरित

बँक इमारत व परिसरामध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करावी. ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय, एटीएम कॅश डिपॉझिट मशिन या बँकेच्या इतर सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्याबाबत बँकांनी प्रेरित करावे. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

loading image