गृह अलगीकरणाची सुविधा बंद; २० फेब्रुवारीपर्यंतचे निर्देश

धनराज माळी
Monday, 18 January 2021

कोविड बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात यावे. संबधित अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील कोविड रुग्णालयांचा आढावा घेऊन आवश्यक सुविधा असल्याची खात्री करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत.

नंदुरबार : जिल्ह्यातील कोविड १९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी २० फेब्रुवारी २०२१ पर्यंत गृह अलगीकरणाची सुविधा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. 
कोविड बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात यावे. संबधित अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील कोविड रुग्णालयांचा आढावा घेऊन आवश्यक सुविधा असल्याची खात्री करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. गृह अलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसात कोविड बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर आदेश देण्यात आले आहेत. 

संपर्कातील सर्व व्यक्तींची घ्‍यावी नोंद 
कोविड बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची नोंद घेण्याचे निर्देशही डॉ. भारुड यांनी दिले आहेत. कोविड बाधित आढळून आलेल्या गावात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्तीश: भेट द्यावी. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची स्वॅब चाचणी करावी आणि कोविड बाधित आढळून आल्यास तात्काळ कोविड रुग्णालयात दाखल करावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

तर लग्न समारंभामध्ये कारवाई 
लग्न समारंभ, अंत्यविधी तसेच गर्दी होणाऱ्या इतर विधी व सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. भारुड यांनी दिले आहेत. नागरिकांकडून मास्क घालणे आणि शारिरीक अंतराबाबत नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news coronavirus home quarantine facility closed collector rajendra bharud