esakal | लपून छपून व्यवसाय; तळोद्यातील ३५ दुकाने सील
sakal

बोलून बातमी शोधा

taloda nagar palika

लपून छपून व्यवसाय; तळोद्यातील ३५ दुकाने सील

sakal_logo
By
टिम इ सकाळ

तळोदा (नंदुरबार) : केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी असताना इतर दुकाने अर्थात कापड, मोबाईल विक्री व दुरुस्ती, इलेक्ट्रिकल्स सामानाची व भांड्यांची दुकाने विनापरवानगीने लपून छपून व्यवसाय करत असल्याने नगरपालिकेने अशा ३५ दुकानांना सोमवारी (ता.३) सिल लावून बंद केले. तर एका कापड दुकानदाराला १ हजार रुपयाचा दंड केला. त्यामुळे प्रशासनाला न जुमानणाऱ्या दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे व्यवसाय सुरू नसल्याने सर्व व्यवहार ठप्प राहात असल्याने दुकानदारांना व्यवहार बंद असणे अडचणीचे ठरत आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकानदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुरवातीला १५ एप्रिल ते १ मे सकाळी ७ ते ११ या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने अर्थात किराणा दुकान व फळफळावळ तसेच भाजीपाला दुकानांना परवानगी दिली होती. त्यानंतर पुन्हा लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने जिल्ह्यात १५ मे पर्यंत संचारबंदी व आधीचेच आदेश लागू असल्याचे कळविले होते. त्यामुळे इतर दुकानदारांना आपली दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी नव्हती. असे असले तरी अनेक कापड दुकानदार व इतर लहानमोठे व्यावसायिक लपून छपून आपल्या दुकानांमध्ये ग्राहकांना विनापरवानगी प्रवेश देऊन आपला व्यवसाय करत होते. त्यामुळे असे दुकानदार प्रशासनाला देखील जुमानत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

कारवाई सुरूच राहणार

अखेर कोरोना विषाणू कोणालाही ओळखत नाही, नियमांचे पालन केले तरच आपण कोरोनाला हरवू शकतो अशी परिस्थिती असल्याने शेवटी नगरपालिका प्रशासनाने सोमवारी शहरातील ३५ दुकानांना सील केले. त्यामुळे दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या पथकाने सांगितले. ही कारवाई नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी राजेंद्र माळी, कर निरीक्षक मोहन सूर्यवंशी, दिगंबर सूर्यवंशी, अनिल माळी, नारायण चौधरी, सुनील सूर्यवंशी, जगदीश सागर, छोटु चौधरी, गंगाराम नाईक, गोरख जाधव आदींच्या पथकाने केली.

शाब्दिक चकमकींमुळे चित्रीकरण

शहरात कारवाई करताना काही दुकानदार जुमानत नसल्याने अनेकवेळा हमरीतुमरीचे व शाब्दिक चकमकीचे प्रसंग घडतात. त्यात नागरिकांना आवाहन करत असताना नियमांचे पालन करण्यासाठी सांगावे लागते. त्यामुळे दुकानांना सील लावताना पालिकेच्या पथकाने चक्क व्हिडिओ शूटिंग करून कारवाई केली. त्यामुळे शहरात एकच चर्चेचा विषय झाला होता.

loading image