esakal | नियमांचे पालन न करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

बोलून बातमी शोधा

minister padvi

बाहेरच्या जिल्ह्यात किंवा राज्यात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविल्याने संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता असे घडू नये; यासाठी त्या- त्या जिल्ह्यातील प्रशासनाशी चर्चा करावी.

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नंदुरबार : ग्रामीण भागात वाढणारा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिले.

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते.

ॲड. पाडवी म्हणाले, की ग्रामीण भागात लसीकरण मोहिम राबविण्यासोबत संपर्क साखळी खंडीत करण्यासाठी वेळीच प्रयत्न करण्यात यावे. या संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. गरजेनुसार व्यवस्थेत बदल करून रुग्णांसाठी चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करावा. सर्व यंत्रणांनी समन्वयाने संपर्क साखळी तोडण्यासाठी नियोजन करावे..

वेळीच उपचार घ्‍यावे
प्रकृती अत्यंत खालावल्यानंतर रुग्णाला उपचारासाठी आणण्याऐवजी नागरिकांनी वेळीच उपचार घ्यावेत. याबाबत जागृती करण्यात यावी. बाहेरच्या जिल्ह्यात किंवा राज्यात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात पाठविल्याने संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता असे घडू नये; यासाठी त्या- त्या जिल्ह्यातील प्रशासनाशी चर्चा करावी. लग्नसोहळे घरगूती स्वरुपात करण्याबाबत किंवा काही कालावधीनंतर घेण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात यावे. होम क्वारंटाईन रुग्ण बाहेर फिरणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

तर कठोर कारवाई करा
शहरात होणारी गर्दी कमी करण्यासाठी लॉकडाऊन काळात सुरू असलेली आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसलेली दुकाने सील करण्यात यावी. अत्यावश्यक सेवेत नसलेल्या वाहनांना इंधन देणाऱ्या पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात यावी. अशा कारवाईत कुचराई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. 

शासनस्तरावर सर्व सहकार्य
खाजगी कोविड रुग्णालयांना रेमडिसीवीरची कमतरता भासत असल्याने जिल्ह्यात इंजेक्शनचा पुरवठा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांशी चर्चा करण्यात येईल. जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, त्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल. अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत मुख्य सचिवांशी चर्चा करण्यात येईल, असे पालकमंत्री म्हणाले.