esakal | तळोद्यात ४० लाखांचा ऑक्सिजन प्लँट
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen plant

तळोद्यात ४० लाखांचा ऑक्सिजन प्लँट

sakal_logo
By
सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार) : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजन बेड अपुरे पडत असून, ऑक्सिजनचा तुटवडाही जाणवत आहे. यावर उपाय म्हणून आमदार राजेश पाडवी यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून उपजिल्हा रुग्णालयात ४० लाख रुपयांचा ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजेश पाडवी यांनी दिली. यामुळे दोन्ही तालुक्यांतील गरीब, गरजू नागरिकांची सोय होणार आहे.

कोरोनाचा दुसऱ्या लाटेत तळोदा शहरासह तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. पॉझिटिव्ह व त्यातल्या त्यात श्वास घ्यायला त्रास होणारे रुग्ण उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता, रुग्णांना ऑक्सिजन बेड अपुरे पडत आहेत. तसेच ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजन बेडसाठी इतरत्र संपर्क साधून त्याठिकाणी रुग्णांना उपचारासाठी दाखल करीत आहेत. यात वेळेवर योग्य तो उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे.

स्‍थानिक निधीतून प्‍लँट

तळोदा पालिका व तालुका आरोग्य विभागाने येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लँट उभारण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी मान्य केली आहे. त्यानुसार येथील उपजिल्हा रुग्णालयात आमदार पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून ४० लाख रुपयांचा ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

शहादा येथेही ऑक्सिजन प्लँट

शहादा शहरात व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यामुळे तेथील आरोग्य यंत्रणेनेवर ताण पडत असून, रुग्णांची संख्या पाहता उपलब्ध सोयी- सुविधा अपुऱ्या व तोडक्या पडत आहेत. त्यामुळे तेथे आमदार पाडवी यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून ४० लाखांचा ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार आहे.

शहादा- तळोदा मतदारसंघातील नागरिकांची सोय व्हावी, त्यांना ऑक्सिजन बेडसाठी दुसऱ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी तळोदा व शहादा या दोन्ही ठिकाणी माझ्या आमदार निधीतून ऑक्सिजन प्लँट तयार करण्यात येणार आहे. लवकरच कामाला सुरवात होत आहे.

- राजेश पाडवी, आमदार

संपादन- राजेश सोनवणे