esakal | आई देखत मुलीला गाडीवर बसवून नेले; अन्‌ पाचव्या दिवशी सापडला मुलीचा मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

crime news kidnaping

शेत गुजरात राज्याच्या हद्दीत असल्याने गुजरात पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर बालिकेचा मृतदेह निझर येथे नेण्यात आला आहे. दरम्यान, तब्बल पाचव्या दिवशी बालिका मृतावस्थेत आढळल्याने पोलिसांपुढे दुचाकीस्वारांना शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. 

आई देखत मुलीला गाडीवर बसवून नेले; अन्‌ पाचव्या दिवशी सापडला मुलीचा मृतदेह

sakal_logo
By
फुंदीलाल माळी

तळोदा (नंदुरबार) : मोटरसायकलने धडक देत जखमी बालिकेला उचलून नेत दुचाकीस्वारांनी पोबारा केला होता. अखेर खेडले ते पिसावर दरम्यान तब्बल पाचव्या दिवशी दादरच्या शेतात मृतावस्थेत ती बालिका आढळून आली. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.
घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली. मात्र, हे शेत गुजरात राज्याच्या हद्दीत असल्याने गुजरात पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर बालिकेचा मृतदेह निझर येथे नेण्यात आला आहे. दरम्यान, तब्बल पाचव्या दिवशी बालिका मृतावस्थेत आढळल्याने पोलिसांपुढे दुचाकीस्वारांना शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. 
तळोदा- बोरद रस्त्यावर १९ जानेवारीला ऊस तोडणी कामगाराची मुलगी मुन्नी मोत्या पटले (वय ९) ही पाणी भरण्यासाठी जाताना रस्ता ओलांडत होती. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने तीला धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तशा अवस्थेतच दुचाकीस्वारांनी मुलीला दुचाकीवर बसवून तेथून पोबारा केला होता. घटनेची माहिती कळताच मुलीचे पालक व नातेवाइकांनी, कदाचित दवाखान्यात नेले असेल, असा कयास लावून रुग्णालयांमध्ये तपास केला. मात्र, मुलगी कुठेही सापडली नव्हती. त्यानंतर घटनेची माहिती पोलसांना देण्यात आल्यावर तळोदा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. 

दुर्गंधी आली म्‍हणून लागला शोध
पोलिसांचे स्वतंत्र पथक नियुक्त करून बालिकेचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. त्यासाठी तळोदा पोलिसांची चार पथके दिवस-रात्र कार्यरत होते. गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीसदेखील घटनेच्या मागावर होते. मात्र, दुचाकीस्वारांचा व मुलीचा शोध लागत नव्हता. सोशल मीडियावर तसेच, तालुक्यातील प्रत्येक गावात पोलीस पाहणी करत होते. स्वतः पोलीस निरीक्षक नंदराज पाटील व त्यांचे सहकारी जनजागृती करत मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. अखेर शनिवारी (ता. २३) पिसावर येथील शेतकरी खेडले रस्त्याकडे जात असताना दादरच्या शेताजवळ त्यांना दुर्गंधी आली. त्यामुळे तेथे पाहिल्यावर त्यांना मृतावस्थेत मुलगी आढळून आली. त्यांनी तातडीने सरपंच बबन पानपाटील यांना माहिती दिली. पानपाटील यांना घटनेची माहिती असल्याने ते स्वतः कढेल येथे मुलीच्या आई-वडिलांना घेण्यासाठी गेले. आई-वडील आल्यानंतर मुलीचा मृतदेह ओळखला व त्यांनी टाहो फोडला. 

गुजरात पोलिसांना पाचारण
सदर घटना गुजरात राज्याचा हद्दीत असल्याने तातडीने निझर पोलीस ठाणे व तळोदा पोलिसांना माहिती कळविण्यात आली. घटनास्थळी गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलिस निरीक्षक नंदराज पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, कॉन्स्टेबल संजय नाईक, युवराज चव्हाण, विजय ठाकरे, रवींद्र पाडवी, लक्ष्‍मण कोळी, गुन्हा अन्वेषण विभागाचे विशाल नागरे, बापू बागुल यांनी पाहणी केली. डॉग स्कॉड व फॉरेन्सिक लॅब पथकानेही घटनास्थळी पाहणी केली. श्‍वानाने दादरच्या शेतामधील पश्‍चिमेकडे धाव घेतली, मात्र खेडले- पिसावर रस्ता पूर्वेकडे असताना श्‍वान पश्‍चिमेकडे गेल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. 
 
निर्दयी दुचाकीस्वार शोधण्याचे आव्हान 
तब्बल पाच दिवसांनंतर बालिका मृतावस्थेत सापडली. ती अपघातात मृत पावली की तिला गंभीर जखमी अवस्थेतच सोडून दुचाकीस्वार निघून गेले, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, आता त्या निर्दयी मोटारसायकलस्वारांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. मात्र, पोलिस आज ना उद्या त्या निर्दयी दुचाकीधारकांचा शोध घेतीलच, असा विश्‍वास बालिकेच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे