थरारक घटना..पपईच्या शेतात दगडाने ठेचले डोके; सकाळी दृश्‍य पाहून धावत सुटला सालदार

फुंदीलाल माळी
Monday, 18 January 2021

शेतात सकाळच्या सुमारास काम करणारा जागल्या सकाळी दहा वाजता पिकांना खत- पाणी देण्यासाठी गेला असता त्याला शेताच्या चारित 15 ते 17 वर्षे वयोगटातील युवक पडलेला आढळून आला.

तळोदा (नंदुरबार) : तळोदा- बोरद रस्त्यावरील कढेल फाट्याजवळ पपईच्या शेतात एका 15 ते 17 वर्षे वयोगटातील युवकाचा दगडाने निर्घूण खून झाल्याची घटना घडली. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मयताची ओळख अजून पटलेली नाही. एंजल नावाचा श्वानाने शेतातून बाहेर येत बोरद रस्त्यावरील झाडापर्यंत मार्ग दाखवला व तेथेच घुटमळले. त्यामुळे वाहनातून मारेकरी पसार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

तालुक्यातील बोरद रस्त्यावर कढेल फाट्याजवळ नयन प्रकाश पाटील यांचे शेत आहे. या शेतात पपईची मोठी झाडे आहेत. शेतात सकाळच्या सुमारास काम करणारा जागल्या सकाळी दहा वाजता पिकांना खत- पाणी देण्यासाठी गेला असता त्याला शेताच्या चारित 15 ते 17 वर्षे वयोगटातील युवक पडलेला आढळून आला. त्‍याने तातडीने शेत मालकास याबाबत माहिती दिली. 

डॉग स्‍कॉडला पाचारण
शेत मालकाने कढेल व तळवे येथे कळवले. तळवे येथील पोलिस पाटील भरत पटेल यांनी पोलीस स्टेशन येथे माहिती दिली. पोलिसांनी मोहिदा येथील पोलीस पाटील यांना कळवून तळोदा पोलिस स्टेशनची टीम घटनास्थळी दाखल झाली. नंदुरबार येथून फॉरेन्सिक लॅब पथक व डॉग स्कॉड मागवण्यात आले. खुनाचा घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक नंदराज पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, हेडकॉन्स्टेबल अजय पवार, रवींद्र कोराळे, युवराज चव्हाण, प्रकाश चौधरी, फॉरेन्सिक लॅब पथकाचे ठसे तज्ञ उपनिरीक्षक पावरा, पोलीस नाईक लाडकर, रामोळे तसेच डॉग स्कॉडचे हवालदार दिलीप गावित, गोकुळ गावित, संदीप खंदारे यांनी भेट देऊन पाहणी केली.

मोबाईलही दगडाने फोडलेला
डॉग स्कॉडमधील एंजल नावाचा श्वानाने शेतात फेरफटका मारून शेतातून बाहेर निघाल्यानंतर बोरद रस्त्यावरील झाडापर्यंत मार्ग दाखवला व ते तेथेच घुटमळले. त्यामुळे रस्त्यावर येऊन झाडाजवळ मारेकरी वाहनाने पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी मोबाईल आढळून आला असून मोबाईलला देखील दगडाने ठेचण्यात आले आहे. त्यामुळे नेमका खून कशासाठी व का झाला? हे शोधून काढणे पोलिसांना आव्हान आहे.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news crime news taloda road young boy murder case