esakal | लोकवर्गणीतून साकारले कोविड उपचार केंद्र

बोलून बातमी शोधा

covid center
लोकवर्गणीतून साकारले कोविड उपचार केंद्र
sakal_logo
By
टिम इ सकाळ

सारंगखेडा (नंदुरबार) : कोरोना रुग्णांना नैसर्गिक ऑक्सिजनसोबतच विनोद, योगासने, साग्रसंगीत आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली याचे वेगळेच नाते आहे. ही बाब लक्षात घेत लोकवर्गणीच्या मदतीने सारंगखेडा (ता. शहादा) येथील एकमुखी श्रीदत्त मंदिर सभागृहात श्रीदत्त कोविड उपचार केंद्र सुरू केले आहे. येथे उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.

येथील मुन्नादादा ग्रुप समूहाच्‍या संवेदनशीलतेतून समाजातील गरीब व गरजूंना मदत, कोरोना रुग्णांना ऑक्‍सिजनसह वैद्यकीय मदतीसाठी मदतनिधी उभारला. गावातील दत्तमंदिर संस्थेने पुढाकार घेत दोन्ही सभागृहे कोविड उपचार केंद्रासाठी खुली केली. स्वेच्छेने दिलेला निधी गरीब व गरजूंना मदत करण्यासह सेंटरसाठी ऑक्‍सिजन मशिन व रुग्णांच्या बेडसाठी खर्ची केला. ऑक्‍सिजन सिलिंडर, डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी आदी आवश्यक अधिकारी, कर्मचारी उपलब्ध झाले.

असे आहे कोविड सेंटर

५० बेडची सुविधा असलेल्या या उपचार केंद्रात दहा ऑक्‍सिजन बेड आहेत. कमीत कमी खर्चात सेवा दिली जात आहे, तर गरीब व गरजूंकडून कुठलीही फी आकारली जात नाही. या उपचार केंद्रात रुग्णांना मानसिक शांती मिळावी यासाठी विनोद करून हसविणे, योगासने, भक्ती व साग्रसंगीत यासह अन्य उपचार थेरपीही वापरण्यात येत आहे. अनेक रुग्ण कोरोनातून बरे होऊन दत्ताचा आशीर्वाद घेत घरी परतले आहेत.

भक्तिमय वातावरणात कोविड सेंटर

श्रीदत्त उपचार केंद्रात रुग्ण आल्यावर सर्वप्रथम प्रवेशद्वाराच्या बाहेरून त्याला श्रीदत्त प्रभूंचे दर्शन होते. त्यामुळे रुग्ण देवाच्या संरक्षणात येतो. त्यातून तो निम्‍मा बरा होतो. पहाटे, दुपारी व सायंकाळी श्रीदत्त प्रभूंची आरती होते. रुग्णालाही त्याचा लाभ मिळतो. त्यामुळे येथील रुग्ण दिवसभर भक्तिमय वातावरणात असतो. नैसर्गिक ऑक्‍सिजन, उंचावरील निसर्गरम्य जागा, विविध पक्ष्यांचा किलबिलाट अशा वातावरणात रुग्णसेवा दिली जात आहे.

जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्या वाढल्याने ऑक्सिजन व बेडअभावी अनेक रुग्णांवर वेळेवर उपचार झाले नाहीत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले. ग्रामीण भागातील रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत म्हणून श्रीदत्त कोविड उपचार केंद्र सुरू केले आहे.

- जयपालसिंह रावल, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, नंदुरबार