नंदुरबारमध्ये कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ यशस्वी 

धनराज माळी
Saturday, 2 January 2021

ड्राय रनच्या माध्यमातून लसीकरणात येणाऱ्या अडचणी लक्षात येतील आणि त्यानुसार पुढील नियोजन करण्यात येईल. या सराव चाचणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होईल.

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत या सराव चाचणीचा सकाळी ९ ला शुभारंभ करण्यात आला. 

सराव चाचणीमुळे विश्वासाची भावना 
यावेळी डॉ.भारुड म्हणाले, ड्राय रनच्या माध्यमातून लसीकरणात येणाऱ्या अडचणी लक्षात येतील आणि त्यानुसार पुढील नियोजन करण्यात येईल. या सराव चाचणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होईल. दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठीदेखील प्रशासनाने नियोजन पुर्ण केले आहे. या भागात सीएसआर निधीतून आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात लसीकरणाच्यावेळी समस्या येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सातपुते आदी उपस्थित होते. 

चार जिल्‍ह्‍यात नंदुरबारचा समावेश
जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील सराव चाचणीची पाहणी केली. राज्यात नंदुरबारसह पुणे, नागपूर आणि जालना या चारच जिल्ह्यांची ड्राय रनसाठी निवड करण्यात आली होती. जिल्ह्यातील तिन्ही ठिकाणी आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे सर्व तयारी करण्यात आली. वीज, इंटरनेट, सुरक्षेसोबत प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्षाच्या तयारीचे अवलोकन यावेळी करण्यात आले. 

असे झाले ‘ड्राय रन’ 
जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय अशा तीन ठिकाणी ही सराव चाचणी घेण्यात आली. प्रत्येक ठिकाणी २५ कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी सहभागी करून घेण्यात आले. प्रत्यक्ष लसीकरण मात्र करण्यात आले नाही. ७४ कर्मचारी ड्राय रनसाठी उपस्थित होते. लसीकरणासाठी पाच कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी वेगळा मार्ग होता. कर्मचारी लसीकरणासाठी आल्यानंतर प्रतिक्षा कक्षात त्याला सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगण्यात आले. क्रमानुसार कर्मचाऱ्यांना नोंदणी कक्षात नेण्यात आले. त्याठिकाणी ‘कोव्हिन’ ॲपवर त्यांची नोंद आणि त्यांचेकडील ओळखपत्र तपासण्यात आले. लसीकरणासाठी तोच कर्मचारी आला असल्याची खात्री झाल्यानंतर लसीकरण कक्षात लसीकरणाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. तेथील कर्मचारी लसीकरणानंतर घ्यावयाच्या दक्षतेबाबतही सूचना देत होते. लसीकरणानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यास ३० मिनीटे निरीक्षणाखाली वेगळ्या कक्षात ठेवण्याचेदेखील प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले. या कक्षात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news dry run of corona vaccination collector bharud