महाराष्ट्रासाठी अत्यंत दु:खद बातमी, दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात नंदुरबारच्या शेतकरी महिलेचा मृत्यू

धनराज माळी
Thursday, 28 January 2021

शहाजापुर बॉर्डर दिल्ली येथील शहाजापूर बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्‍या सहभागी होण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांसोबत गेल्‍या होत्‍या. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्ते दिल्लीला गेले होते.

नंदुरबार : दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी गेलेल्या अंबाबारी (ता. अक्कलकुवा) येथील लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्या सीताबाई रामदास दळवी (वय 56) यांच्या परतीच्या प्रवासात आज सकाळी मृत्यू झाला. त्यांना अंबाबारी येथे आणण्यात येत असून त्यांच्यावर दुपारी बारा वाजेपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
शहाजापुर बॉर्डर दिल्ली येथील शहाजापूर बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्‍या सहभागी होण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांसोबत गेल्‍या होत्‍या. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्ते दिल्लीला गेले होते. त्यात अंबाबारी (ता. अक्कलकुवा) येथील कार्यकर्ते सहभागी झाले होते. २६ जानेवारीचे आंदोलन आटोपून लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते बुधवारी (ता.२७) परतीच्या प्रवासाला निघाले होते. दरम्यान गाडी चुकल्याने कार्यकर्त्यांनी जयपूर येथे मुक्काम केला होता. 

सकाळी उठून फ्रेश झाल्‍या अन्‌ पुन्हा झोपल्‍या
आज सकाळी सीताबाई तडवी यांना बरे वाटत नव्हते; त्या उठल्या आणि फ्रेश झाल्यानंतर पुन्हा झोपून गेल्या. झोपेतच त्यांच्या सकाळी साडेसहाच्या सुमारास मृत्यू झाला. ही बाब कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली; डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना अंबाबारी येथे आणले जात आहे. त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सीताबाई तडवी या पंचवीस वर्षापासून वंचितांच्या संघर्षासाठी लोकसंघर्ष मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news farmer strike delhi old women death in travling