नवरा- बायोकोंचे असेही नशीब; या गावात पाच जोडपी कारभारी

सम्राट महाजन
Tuesday, 19 January 2021


ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्‍गजांना पराभवाचा सामना करावा लागला. अर्थात तरूण पिढीकडे ग्रामपंचायतीचा कारभार सोपविला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत दीर भावजाय, सासू- सुन, काका- पुतण्या अशी लढत पाहण्यास मिळाली. पण पाच अशा ग्रामपंचायती आहेत; जेथे नवरा- बायकोंचे नशीबच खुलले. पती- पत्‍नी निवडणुकीच्या रिंगणारा उभे राहिले आणि जिंकले देखील.

तळोदा (नंदुरबार) : तळोदा तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा निकाल घोषित झाला असून यात एक वेगळाच योगायोग बघण्यास मिळाला. या निवडणुकीत चक्क ५ पती- पत्‍नीच्या जोडप्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे एकाच ग्रामपंचायतीमध्ये पती- पत्‍नी यापुढे ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करणार आहेत.  
तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन, पाडळपूर, रेवानगर, नर्मदानगर, बंधारा, सरदारनगर व राणीपुर या सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी घोषित करण्यात आला आहे. निकालानंतर प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले भाजप व काँग्रेसने प्रत्येकी ४ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याच्या दावा- प्रतिदावा केला आहे. कोणाचा दावा किती खरा, खोटा आहे, हे येत्या काही दिवसात कळेलच. मात्र घोषित करण्यात आलेल्या निकालात एक वेगळाच अजब योग बघावयास मिळाला असून चक्क ५ जोडपींनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. आता ही ५ पातीपत्‍नीची जोडी कशा पद्धतीने आपापल्या ग्रामपंचायतीच्या विकास साधतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 
 
विजयी ५ पती-पत्‍नीच्या जोड्या 
बंधारा येथील प्रभाग क्रमांक १ मधून विजयसिंग पाडवी यांनी तर याच प्रभागातून त्यांच्या पत्नी सुनीता पाडवी. पाडळपूर येथे तर चक्क २ जोडप्यांनी विजय मिळवला आहे. पाडळपूर येथील प्रभाग क्रमांक १ मधून सुरुपसिंग ठाकरे यांनी, तर याच प्रभागातून त्यांच्या पत्नी सुमित्राबाई ठाकरे आणि प्रभाग क्रमांक ३ मध्ये देवीलाल ठाकरे यांनी व त्यांच्या पत्नी भांगुबाई ठाकरे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करत ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून प्रवेश केला आहे. नर्मदानगर येथील प्रभाग क्रमांक २ मधून पुन्या वसावे यांनी तर प्रभाग क्रमांक ३ मधून त्यांच्या पत्नी दोंगीबाई वसावे यांनी विजय मिळवला आहे. सरदार नगर येथील प्रभाग क्रमांक १ मधून रमेश तडवी यांनी तर याच प्रभागातून त्यांच्या पत्नी कविताबाई तडवी यांनी विजय मिळवला आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news five gram panchayat couples in charge of five villages