esakal | चार दिवसांचा आजारी तान्हुला रूग्‍णालयात अन्‌ मातेची सुरू झाली परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

mother exam

कोरोना कालावधीमुळे द्वितीय वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक काहीसे बदलले. याच कालावधीत तिची प्रसुती होवून तिला मुलगा झाला. रूहीनाज आणि मुलाची प्रकृती पहिल्या दिवशी चांगली होती. मात्र दुसऱ्या दिवशी मुलाची प्रकृती बिघडली.

चार दिवसांचा आजारी तान्हुला रूग्‍णालयात अन्‌ मातेची सुरू झाली परीक्षा

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : अल्पसंख्यांक समाजातील युवतीची शिक्षणासाठी विशेष धडपड सुरु आहे. चार दिवसाच्या मुलाला धुळे येथील रूग्‍णालयात ठेवून ती स्वतः डि.एड्‌ची परीक्षा देण्यासाठी रोज नंदुरबार केंद्रात दाखल होत आहे. तिच्या या शिक्षणाप्रती असलेल्या प्रेमाबद्दल विशेष कौतुक होत आहे. 
सिटी हायस्कुलचे मुख्याध्यापक शेख मजहरोद्दीन यांची कन्या रुहीनाज इमरान खान ही डि.एड्ची परीक्षा देत आहे. कोरोना कालावधीमुळे द्वितीय वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक काहीसे बदलले. याच कालावधीत तिची प्रसुती होवून तिला मुलगा झाला. रूहीनाज आणि मुलाची प्रकृती पहिल्या दिवशी चांगली होती. मात्र दुसऱ्या दिवशी मुलाची प्रकृती बिघडली. नंदुरबार येथील स्थानिक दवाखान्यात मुलाची प्रकृती दाखविण्यात आली. एक दिवस उपचार झाला. त्यानंतर मुलाचे प्लेट्सलेट सातत्याने कमी होत होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला धुळे येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे तपासण्या करण्यात आल्या. 

आठवडाभर डॉक्‍टरांच्या निगराणीत
प्रकृतीत सुधारणा होत नसल्‍याने चिमुकल्‍याला सुमारे आठवडाभर डॉक्टरांच्या निगराणीखाली दाखल करुन घेणे आवश्यक होते. त्यानुसार त्यास तेथे दाखल केले. याच कालावधीत रुहीनाजची डि.एड्.ची परीक्षा सुरु झाली. त्याचबरोबर तिचा नंदुरबार ते धुळे असा रोजचा प्रवास सुरु झाला. ती सायंकाळी मुक्कामाला धुळे येथे मुलासोबत असते. परिक्षेसाठी तिला नंदुरबारला यायचे असते; म्हणून तिचा भाऊ शेख मुज्जमील हा पहाटे चारला धुळे येथे जातो. तेथून तिला घेवून दहा वाजेपर्यंत नंदुरबारला परत येतो. ती दुपारी दोननपर्यंत परीक्षा देते. तीन वाजता तिचे वडील शेख मजहरोद्दीन तिला घेवून धुळे येथे जातात. 

डॉक्‍टरांनीही केला सॅल्‍युट
रूहीनाजचा हा प्रवास पाहून मुलावर उपचार करणारे डॉ. जोशी भारावले. ते म्हणाले, मी मुलावर उपचार करतो, मुलगा प्रतिसादही देत आहे. परंतु तुझी शिक्षण आणि मुलाप्रती असलेली भावना लक्षात घेता तुला सॅल्युट केला पाहिजे. शिक्षणाचे महत्त्व तिला घरातून समजले आहे. तिचे वडील मुख्याध्यापक, तर सासरे आश्रमशाळेत शिक्षक, पती पठाण इमरान खान हे कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यामुळे तिला शिक्षणाचे विशेष महत्त्व आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे