esakal | शिधापत्रिकाधारकांना मे महिन्यात मोफत धान्य वितरण

बोलून बातमी शोधा

ration holders
शिधापत्रिकाधारकांना मे महिन्यात मोफत धान्य वितरण
sakal_logo
By
टिम इ सकाळ

नंदुरबार : शासनाने कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून, संचारबंदीत नागरिकांच्या समस्या लक्षात घेता अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना मे महिन्यात रेशन दुकानावर वितरित होणारे धान्य मोफत देण्यात येणार आहे.

संचारबंदीत अनेकांसमोर रोजगाराची समस्या असल्याने गरजू नागरिकांच्या किमान भोजनाची व्यवस्था व्हावी, यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक लाभार्थ्यास दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ, तर अंत्योदय योजनेतील प्रत्येक कुटुंबास १२ किलो तांदूळ आणि २३ किलो गहू मोफत देण्यात येणार आहे.

मार्चमध्‍ये ९४ हजार कुटूंबांना वाटप

कोरोना संकटकाळात सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे धान्याचे वितरण वेळेवर करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न पुरवठा विभागाने केला आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यातील १ हजार ६३ रेशन दुकानामार्फत अंत्योदय अन्न योजनेंतर्गत ९३ हजार ९८० कुटुंबांना ९४३ क्विंटल गहू (फक्त अक्कलकुवा तालुक्यासाठी), १३ हजार १५४ क्विंटल भरडधान्य, १८ हजार ७९६ क्विंटल तांदूळ आणि ९४० क्विंटल साखरेचे वितरण करण्यात आले.

प्राधान्‍य कुटुंब योजनेतंर्गत वाटप

याच कालावधीत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत एक लाख ३८ हजार ८८३ कुटुंबांना ७४९ क्विंटल गहू (फक्त अक्कलकुवा तालुक्यासाठी), ११ हजार २८३ क्विंटल भरडधान्य आणि १८ हजार २१० क्विंटल तांदुळाचे वितरण करण्यात आले. विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर धान्य मिळत असल्याने संकटकाळातही कुटुंबातील सदस्यांच्या भोजनाची व्यवस्था झाली आहे.

एप्रिल महिन्यातही नेहमीच्या अल्प दरानुसार धान्य वितरण होणार असून, मे महिन्यातील धान्य मोफत मिळणार आहे. अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानदाराला कोणतेही शुल्क न देता मे महिन्यातील नधान्य घेता येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली.