फायनान्स कंपनीला दणका; जप्त केलेले वाहन करा परत अन्यथा व्याजासह द्या सात लाख

धनराज माळी
Friday, 15 January 2021

व्यवहार चांगला असल्याने कंपनीने पुन्हा त्यांना तीन लाखांचे कर्ज मंजूर केले. शहा यांनी दोन्ही कर्जांचे हप्ते नियमित भरले आहेत. तथापि, या वाहनाचा २८ मे २०१९ ला अपघात झाला होता. त्यानंतर काही हप्ते थकीत झाले.

नंदुरबार : जप्त केलेले वाहन सुस्थितीत परत करावे, अथवा वाहनाचे सात लाख रुपये तक्रारदाराला व्याजासह परत करावेत, असा निकाल नंदुरबार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चोला मंडलम या फायनान्स कंपनीला दिला आहे. 
येथील नसीर शहा रमजान शहा यांचे (एमएच १८, डब्ल्यू ६५६७) सुमारे १४ लाखांचे वाहन आहे. त्यावर त्यांनी चोलामंडलम या फायनान्स कंपनीकडून पाच लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. त्यांचा व्यवहार चांगला असल्याने कंपनीने पुन्हा त्यांना तीन लाखांचे कर्ज मंजूर केले. शहा यांनी दोन्ही कर्जांचे हप्ते नियमित भरले आहेत. तथापि, या वाहनाचा २८ मे २०१९ ला अपघात झाला होता. त्यानंतर काही हप्ते थकीत झाले. त्यामुळे फायनान्स कंपनीने त्यांना कोणतीही पूर्वसूचना अथवा रीतसर नोटीस न देता जबरदस्तीने वाहन बेकायदा ताब्यात घेतले. याबाबत शहा यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

चुकीचे मुल्‍यांकन करत थकबाकी
जप्त केलेले वाहन परत देण्यासाठी शहा यांनी विनंती केली. मात्र, फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे मूल्यांकन करून सहा लाख ५३ हजार ८८ रुपयांचे कर्ज थकीत दाखवीत वाहनाची चार लाख ६० हजार रुपयांना विक्री केल्याची माहिती तक्रारदार शहा यांना दिली. वाहनाची किंमत १४ लाख रुपये असताना, हे वाहन कमी किमतीत विक्री केल्याचे दाखवून कंपनीने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला. याबाबत शहा यांनी अ‍ॅड. धनराज गवळी यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दिली होती. आयोगाचे अध्यक्ष एस. पी. बोरवाल, सदस्य बी. पी. केतकर, एम. एस. बोडस या त्रिसदस्यीय न्यायासनासमोर खटल्याची सुनावणी झाली.

४५ दिवसात वाहन करा परत
दरम्यान, दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून तक्रारदाराच्या बाजूने मंचाने निकाल दिला. चोलामंडलम कंपनीने ४५ दिवसांच्या आत जप्त केलेले वाहन तक्रारदाराला परत करावे, अथवा वाहनाची रक्कम सात लाख रुपये व्याजासह परत करावी, तसेच मानसिक व शारीरिक त्रासापासून तक्रारदाराला तीन हजार रुपये भरपाई द्यावी, असा निकाल दिला. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news grahak manch result finance company loan fraud