नंदुरबारमधील ६४ ग्रामपंचायतींसाठी धूमशान 

धनराज माळी
Tuesday, 5 January 2021

नंदुरबार तालुक्यातील १५ ग्रामपंचायती, शहादा तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिगरआदिवासी क्षेत्रातील आहेत. त्याच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

नंदुरबार : जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूकप्रक्रिया पार पडत आहे. सोमवारी (ता. ४) माघारीच्या अंतिम दिवशी २३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. यामध्ये नंदुरबार तालुक्यातील १५, नवापूरातील दोन, तर शहाद्यातील सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एकूण ६२८ जणांनी माघार घेतली आहे. उर्वरित ६४ ग्रामपंचायतींसाठी १,३४५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 
माघार घेणाऱ्यांमध्ये नंदुरबार तालुक्यातील २७६, नवापुरातील १८, तळोद्यातील ४७ , शहाद्यातील १९९, अक्कलकुवा येथील १२, तर धडगाव तालुक्यातील ७६ जणांनी माघार घेतली आहे. उर्वरित ६५ ग्रामपंचायतींसाठी १,३४५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये नंदुरबार तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी १८३, नवापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी २२९, तळोद्यातील ग्रामपंचायतींसाठी १३४, शहाद्यातील २१ ग्रामपंचायतींसाठी, घडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी ३३३, तर अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा या ग्रामपंचायतीसाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत. 

अतिदुर्गम भागात एकही बिनविरोध नाही 
धडगाव तालुक्यातील १६, अक्कलकुवा तालुक्यातील एक व तळोदा तालुक्यातील सात अशा २४ ग्रामपंचायतींपैकी एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही. वास्तविक आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचा धडगाव-अक्कलकुवा मतदारसंघ आहे. तर तळोदा आमदार राजेश पाडवी यांचा मतदारसंघ आहे. आमदार पाडवी यांनी गावविकासासाठी बिनविरोध ग्रामपंचायतींना निधी देण्याचे जाहीर करूनही तळोद्यातील एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. 

बिगरआदिवासी ग्रामपंचायती बिनविरोध 
नंदुरबार तालुक्यातील १५ ग्रामपंचायती, शहादा तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिगरआदिवासी क्षेत्रातील आहेत. त्याच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. दरवेळेस या ग्रामपंचायतींमध्येच सर्वाधिक चुरशीच्या निवडणुका झाल्या आहेत. यावेळेस गट-तट विसरून सारे एकत्रित आल्याचे चित्र आहे. काही गावांनी तर बिनविरोध निवडणूक करून इतिहास रचला आहे. कारण आत्तापर्यंत बिनविरोध निवडणूक कधीच झालेली नव्हती. 
 
जिल्ह्यातील बिनविरोध ग्रामपंचायती 
बिनविरोध निवडणुकीत नंदुरबार तालुका आघाडीवर आहे. २२ पैकी १५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यात खर्दे खुर्द, बलदाणे, खोक्राळे, निंभेल, न्याहाली, शनिमांडळ, तलावाडे खुर्द, तिलाली, आराळे, खोंडामळी, माजरे, नगाव, शिंदगव्हाण, विखरण व काकर्दे या गावांचा समावेश आहे. तसेच शहादा तालुक्यातील नांदरखेडा, वर्ढे त. श., बामखेडा त.सा., दोंदवाडे, न्यू असलोद, हिंगणी या सहा ग्रामपंचायती, तर नवापूर तालुक्यातील धुळीपाडा व सागाळी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news gram panchayat election 23 binvirodh