नंदुरबार जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज 

धनराज माळी
Tuesday, 12 January 2021

जेवढी सदस्यसंख्या तेवढ्याच सदस्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले गेले. त्यामुळे आता तेथे मतदान प्रक्रिया होणार नाही. मात्र ६४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यातील सात, शहादा २१, तळोदा सात, धडगाव १६, नवापूर १२, तर अक्कलकुवा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत निवडणूक कार्यक्रम सुरू आहे.

नंदुरबार : जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. त्यासाठी एक लाख १३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात २१२ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. 
नंदुरबार जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी व काही ठिकाणी माघारीच्या शेवटच्या दिवशी आपसांत समझोता घडवून आणत गावपातळीवरील राजकीय नेत्यांनी २३ ग्रामपंचायती बिनविरोध केल्या. म्हणजेच जेवढी सदस्यसंख्या तेवढ्याच सदस्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले गेले. त्यामुळे आता तेथे मतदान प्रक्रिया होणार नाही. मात्र ६४ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यातील सात, शहादा २१, तळोदा सात, धडगाव १६, नवापूर १२, तर अक्कलकुवा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. सुमारे २०० प्रभागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत एक हजार २२९ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोचला असतानाच आता मतदान कर्मचारी नियुक्तीचा कार्यक्रमही अंतिम झाला आहे. 

केंद्राधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती
रविवारी (ता. १०) सर्वच तहसीलस्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. यातून मतदान केंद्रांसाठी मतदान केंद्राधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यातील विविध विभागातील सुमारे ८०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मकरसंक्रांतीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना तालुकास्तरावर बोलावून बॅलेट मशिन्सचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार ठिकठिकाणी मशिन्सची स्वच्छता करण्याचा कार्यक्रम पूर्ण करण्यात आला. दरम्यान, शहादा तालुक्यातील सर्वाधिक २१ गावांमध्ये मतदान होणार आहे. एकूण ७१ प्रभागांत होणाऱ्या मतदान कार्यक्रमासाठी रविवारी प्रशिक्षण घेण्यात आले. याखालोखाल धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या ५३ प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सुमारे २५ हजार मतदारांना मतदान करता यावे, यासाठी तालुका प्रशासनाकडून मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तळोदा तालुक्यातील २३ प्रभागांसाठी मतदान प्रक्रियेचे नियोजन प्रशासनाने केले आहे. नवापूर तालुक्यातील ३५ प्रभागांतील मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

पथकाची नियुक्ती 
निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावांमध्ये भेटी देऊन गैरप्रकार होऊ नये, यावर नियंत्रण ठेवत आहे. हेच पथक निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रांना भेटी देईल.  

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news gram panchayat election mechanism ready for elections