
लॉकडाऊन कालावधीत घेऊन आम्हाला आमच्या गावाकडे कुटुंबीयांमध्ये काही काळ राहू दिले असते तर अधिक बरे वाटले असते. आता आम्ही देखील येण्यास तयार नाहीत असे स्पष्ट उत्तर अनेक उमेदवारांना बाहेरगावी असलेल्या मतदारांकडून ऐकायला मिळत आहे.
सारंगखेडा (नंदुरबार) : लॉकडाउन ना टाईमले हामले गावमा घुसू नई दिनं, आते मतेसनी करता गावले बलाई ऱ्हायनात. आते काबर येऊत भो, असे उद्गार बाहेरगावी असलेल्या बहुसंख्य मतदारांकडून उमेदवारांना ऐकावे लागत आहे. जिल्ह्यात अनेक गावात प्रतिष्ठेची निवडणूक झाली असल्याने बाहेर गावी असलेल्या मतदारांना आपल्याला मतदान करावे यासाठी उमेदवारांना त्यांची मनधरणी करावी लागत आहे. मात्र येथेही कोरोनाचा अप्रत्यक्ष झटका त्यांना मिळत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊन काळात आम्हाला गावाकडे यायचे होते. त्यावेळी गावात प्रवेश बंदी केली. आता ग्रामपंचायत निवडणूक आहे तर मतदानासाठी गावात या म्हणून आग्रह केला जातो. उमेदवारांकडून मतदानासाठी स्वार्थी भूमिका घेतली जात आहे. हीच भूमिका लॉकडाऊन कालावधीत घेऊन आम्हाला आमच्या गावाकडे कुटुंबीयांमध्ये काही काळ राहू दिले असते तर अधिक बरे वाटले असते. आता आम्ही देखील येण्यास तयार नाहीत असे स्पष्ट उत्तर अनेक उमेदवारांना बाहेरगावी असलेल्या मतदारांकडून ऐकायला मिळत आहे.
बाहेर गावी असलेल्या मतदाराचा संताप
ग्रामपंचायत निवडणूकीत बाहेरगावी असलेले मतदार विजयाचे गणित बदलत असतात. त्यामुळे बाहेरगावी असलेल्या मतदारांची आठवण अनेक उमेदवारांना होत आहे. लॉकडाऊन काळात बाहेरगावी गेलेले अनेकजण गावाकडे येऊ का म्हणत होते, तेव्हा ज्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होता तेथील अनेकांना गावाने प्रवेश नाकारला होता.
गाडी पाठवू म्हणत येण्याचा आग्रह
आता निवडणूक येताच त्याच प्रवेश नाकारलेल्यांना आग्रहाचे निमंत्रण दिले जात आहे. असेच एका उमेदवाराने बाहेरगावच्या मतदाराला 'गाडी पाठवू काय?' असे विचारले. त्यावर मतदाराने लॉकडाउनमध्ये यायचे होते, तेव्हा तुमची गाडी पंक्चर झाली होती काय, असे उलटे उत्तर दिले. अर्थात मतदाराचा संताप लक्षात घेत उमेदवारानेही हळूच फोन कट केला.
संपादन ः राजेश सोनवणे