
यंदा सोशल मीडियाचा आधार घेत गाव पातळीवर विविध व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमाने प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.
शहादा (नंदुरबार) : ‘आमचा नेता लई पावरफुल’, ‘सरपंच पदाचे दावेदार’, ‘गावाचा विकास करायचा असेल तर भरघोस मतांनी...यांनाच निवडून द्या’ असे म्हणत गावपातळीवरील कार्यकर्ते सध्या पॅनल प्रमुखाचे गुणगान गात प्रचार करीत आहेत.
शहादा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. परंतु माघारीनंतर सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने २१ ग्रामपंचायतींसाठी ४४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत सर्वाधिक दुरंगी लढती आहेत. अनेक वर्षे एक हाती ग्रामपंचायतीवर सत्ता गाजवणाऱ्या गाव पातळीवरील नेत्यांना मात्र या निवडणुकीत स्थानिक नागरिकांकडून चांगलेच आव्हान दिले जात आहे. काही गावांमध्ये तर पारंपरिक विरोधक एकत्र येऊन तिसऱ्या गटाला आव्हान देत आहेत.
दिग्गज पडद्याआड
गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी मत द्या असा धिंडोराही पिटला जात आहे. गावातीलच काही दिग्गज निवडणुकीपासून दोन हात लांब राहत पडद्यामागून आपले सूत्र हलवत असल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच यंदाच्या निवडणुकीमध्ये तरुणांच्या भरणा जास्त आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुका मध्ये मोठ्या प्रमाणावर चुरस पाहावयास मिळत आहे.
सोशल मीडियाचा आधार...
दरम्यान यंदा सोशल मीडियाचा आधार घेत गाव पातळीवर विविध व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमाने प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात आमचा नेता लय पावरफुल, सरपंच पदाचे दावेदार, फक्त गावाच्या विकासासाठी मत दया. आदींसह विविध रिमिक्स गाण्यांचे ऑडिओ, व्हिडिओ क्लिप टाकून मतदारांना आकर्षित केले जात आहे.
संपादन ः राजेश सोनवणे