esakal | नया है पर जमता है..निवडणूक प्रचाराला कोरोनाकालीन शब्‍दप्रयोग
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat election

निवडणूक काळात 'मास्क', 'सेनिटायझर', 'फिजिकल डिस्टंसिंग' या शब्दांशी वैरत्व पत्करले आहे. तालूक्यात कोरोना संसर्ग वाढत असताना या निवडणूकीतील उमेदवारांना कागदपत्रे गोळा करणे,

नया है पर जमता है..निवडणूक प्रचाराला कोरोनाकालीन शब्‍दप्रयोग

sakal_logo
By
रमेश पाटील

सारंगखेडा (नंदुरबार) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये प्रचारासाठी कोरोना नियमांचाच शब्दप्रयोग होत आहे. एकीकडे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते खासगीत एकमेकांशी संवाद साधतांना सरपंचपद तूर्त 'क्वॉरंटाईन'मध्ये आहे. त्यामुळे त्या इच्छुक उमेदवारांची अवस्था 'आयसीयू'मधील रुग्णासारखी झाली आहे. 'प्रतिबंधित क्षेत्र' शाबूत ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील, विरोधात बोलतो याचा 'स्वॕब' तपासावा लागेल, 'कोवीड सेंटर'ला (भोजनाच्या ठिकाणी) न्या, आदींचा वापर करीत आहेत. मात्र, निवडणूक काळात 'मास्क', 'सेनिटायझर', 'फिजिकल डिस्टंसिंग' या शब्दांशी वैरत्व पत्करले आहे. तालूक्यात कोरोना संसर्ग वाढत असताना या निवडणूकीतील उमेदवारांना कागदपत्रे गोळा करणे, अर्ज दाखल करणे व प्रचार करताना कोरोनाचे नियम पाळण्याकडे सहेतूक दुर्लक्ष करीत आहेत.

गुलाबी थंडीत चर्चा
ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की आघाडी तयार होण्यापासून मतदान होईपर्यंत वेगवेगळ्या चर्चेचे गुन्हाळ सुरू असते. कोणी म्हणतं काय केलंय या सरपंचाने, तर दुसरा म्हणतो केल आहे ना, सिमेंटचा रस्ता. तिसरा म्हणतो जाऊ द्याना कोरोनाच्या काळात नातेवाईकांना क्‍वारंटाइन करुन खुप डोक्याला ताप दिला त्या सरपंचाने, चौथा म्हणतो त्यात काय त्यांनी बरोबरच केले ना. त्यामुळे आपले गाव सुरक्षित राहीले. अशा अनेक रंगतदार चर्चा सध्या गुलाबी थंडीत ओट्यांवर, पानटपऱ्यांवर सुरु आहेत. वार्डात आरक्षण निश्चित असल्याने इच्छूकांनी उमेदवारी दाखल केली आहेत.

रिपोर्ट पॉझिटीव्ह यावा हिच इच्छा
सरपंचपदासाठी इच्छूक असणाऱ्यांना यंदा मतदारांची नाडी ओळखत वॉर्डची सुरक्षितता जपावी लागणार आहे. स्पर्धक उतरल्यानंतर बीपी, शुगर वाढवणाऱ्या चक्रव्यूहातुन बाहेर पडण्यासाठी उमेदवारांचे ऑक्सीजन लेव्हल कमी होत 'ऑक्सीमीटर'ची गरज पडणार नाही; याची काळजी घ्यावी लागेत आहे. सरपंचपद तूर्त 'क्वॉरंटाईन'मध्ये असले तरी आपल्या हक्काचा वॉर्ड जाता कामा नये, यासाठी इच्छूकांनी 'प्रतिबंधित क्षेत्रात' प्रतिस्पर्धकाची बाधा होऊ नये याची काळजी घेण्यासाठी सतर्कता ठेवावी लागत आहे. सरपंच होण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांची अवस्था 'आयसीयू'मध्ये असलेल्या रुग्णासारखी झाली आहे हेही तीतकेच खरे आहे. निवडणूक अहवाल 'पॉझिटिव्ह' की 'निगेटिव्ह' यांच्या प्रतिक्षेसह खात्री नाही. कोरोनाचे संकट अजून संपलेले नसल्याने सर्वांना निवडणूकीच्या आचारसंहिते सोबतच कोवीड-19चे नियम उगाळले जात आहे.

शब्‍दप्रयोगाप्रमाणे व्हावे नियमांचे पालन
सध्या तालूक्यात 27 ग्रामपंचायतींच्या निवडणूकींची धामधुम सुरू आहे. यातील बहुसंख्य तापी पट्यातील आहेत. अगोदरच्या एका सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे अनेकांच्या आशा आकांक्षा उंचावल्या. दुसऱ्या अध्यादेशाने त्या धुळीला मिळाल्या. मात्र, हेच आरक्षण निघेल या अपेक्षेने तर हिरमुसले झालेले आरक्षण बदलेल या आशेने वार्डातील निवडणूकीच्या तयारीला लागलेत. गत आठ दिवसात कोवीड-19च्या नियमांच्या शब्द प्रयोगांचे वाक्य ग्रामीण भागात ऐकावयास येत आहे. तालूक्यात सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. शहरा ऐवजी त्याने ग्रामीण इलाका पादाक्रांत करीत आहे. अशा परिस्थितीत गावगाड्याची जबाबदारी सांभाळणऱ्या उमेदवारांकडून किमान कोरोना नियमांचे पालन अपेक्षित आहे. मात्र, कागदपत्रे जमविणे, उमेदवारी दाखल करणे, प्रचार यात गर्दी दिसली नाही तर त्याचे वजन कमी असल्याचा भास होतो. म्हणून प्रत्येक जण गर्दीनेच सर्वत्र संचार करीत आहेत. चालता बोलता कोरोना नियमांचे शब्द वापरले जात असताना प्रत्यक्ष त्याचे आचरण कोणीही करताना दिसत नाही. यातून बहुदा निवडणूकी नंतर कोरोना सैराट झालेला असेल. 

संपादन ः राजेश सोनवणे