दहा वर्षांतील उसाला सर्वोच्च दर 

धनराज माळी
Wednesday, 10 February 2021

साखर कारखान्याने ऊसदराची उच्चांकी परंपरा कायम राखली आहे. यंदा उसाला एकरकमी दोन हजार ४२५ रुपये प्रतिटन दर घोषित केला आहे. दहा वर्षांची तुलना करता हा सर्वाधिक दर आहे

नंदुरबार : तालुक्यातील समशेरपूर येथील आयान साखर कारखान्याने उसाला प्रतिटन दोन हजार ४२५ रुपये दर दिला आहे. हा दर गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक एस. एस. सिनगारे यांनी दिली. 
कारखान्याच्या ऊसगाळपासंदर्भात माहिती देताना श्री. सिनगारे म्हणाले, की आयान साखर कारखान्याने ऊसदराची उच्चांकी परंपरा कायम राखली आहे. यंदा उसाला एकरकमी दोन हजार ४२५ रुपये प्रतिटन दर घोषित केला आहे. दहा वर्षांची तुलना करता हा सर्वाधिक दर आहे. ऊस उत्पादक जास्तीत जास्त ऊस कारखान्यास देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

दररोज वीजनिर्मिती
कारखान्याची अत्याधुनिक गाळपक्षमता विकसित केली आहे. त्यामुळे कारखाना दररोज सात हजार टन उसाचे गाळप करत आहे. कारखान्याने वीजनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. कारखान्यात दररोज वीजनिर्मिती होत आहे. ही वीज महावितरणला दिली जात आहे. त्याचाही कारखान्याच्या उत्पादन क्षमतेला लाभ होणार आहे. 

कोविड संकटानंतरही भरारी
गाळपक्षमता वाढीसाठी नियोजन केलेले असताना कोविड- १९ सारखे महाभयंकर संकट ओढवले. या संकटावर मात करत कारखाना पूर्ण क्षमतेने नव्हे, तर अधिक क्षमतेने सुरू करण्यास यश आले. कारखान्याकडे नोंद आणि बिगर नोंद संपूर्ण ऊसगाळपाचे नियोजन केले आहे. हा सर्व ऊस गाळप होईपर्यंत कारखाना सुरू राहील. उपलब्ध संपूर्ण उसाचे गाळप वेळेवर करून घेण्यात येईल. अत्याधुनिक मशिनरीचा वापर करून गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती श्री. सिनगारे यांनी या वेळी दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news highest rate of sugarcane in ten years