आदिवासी तरूणाचा विश्‍वविक्रम; किलीमांजारोवर फडकला तिरंगा 

धनराज माळी
Wednesday, 27 January 2021

आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून १९,३४१फूट आहे. अतिशय खराब वातावरणात शून्याच्या खाली तापमान, गोंगावत वाहणारे वारे, उभी चढण, पडणारा बर्फ या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे.

नंदुरबार : टांझानिया (आफ्रिका) प्रजासत्ताकदिनानिमित्त ३६० एक्सप्लोर ग्रुप द्वारे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखराच्या मोहिमेत महाराष्ट्राच्या युवकाने इतिहास घडवत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करून मोहीम यशस्वी केली आहे. २६ जानेवारीला सकाळी ११.१५ वाजता नंदुरबार येथील अनिल वसावे यांनी किलीमांजारो शिखरावर भारताच्या संविधानाची प्रस्तावना वाचून व भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकावून विश्वविक्रम केला आहे. 

आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटी पासून १९,३४१फूट आहे. अतिशय खराब वातावरणात शून्याच्या खाली तापमान, गोंगावत वाहणारे वारे, उभी चढण, पडणारा बर्फ या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक यांनी ही मोहीम पूर्ण केली आहे. या शिखराच्या चढाईसाठी त्यांनी १९ जानेवारीला सुरवात केली होती. असा आगळावेगळा व देशाला अभिमानास्पद विक्रम केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. भारतीय घटनेतील स्वातंत्र, समता, बंधुता, एकात्मता या तत्वांचा प्रचार जगभर यामार्फत होणार आहे. 

अनेक वर्षापासून तयारी
गेली अनेक वर्षे शारीरिक कसरती व वेगवेगळे गिर्यारोहण करत अनिल यांनी तयारी केलेली आहे. येत्या काळात अनिल वसावे ३६० एक्स्प्लोररच्या माध्यमातून युरोप व ऑस्ट्रेलीया खंडातील सर्वोच्च शिखर सर करणार आहेत. 

आमच्या प्रत्येक पावलावर एक मोठे साहस होते. आफ्रिकेतील हे शिखर सर करणे माझ्या कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद, मित्रांची व अनेक बड्या मंडळींनी साथ दिल्यामुळे माझे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले. एकातमीक आदिवासी विकास विभाग प्रकल्प ऑफिस तोलदा. आदिवासी शिक्षक संघ नंदुरबार, जैन इरीगेशन जळगाव, नंदुरबार जिल्हा पत्रकार बंधू यांचे आभार. 
-अनिल वसावे, गिर्यारोहक, नंदुरबार 

अनिल वसावे यांनी जे यश संपादन केले आहे त्याचा सर्वाना अभिमान आहे. संविधान वाचून पूर्ण भारतीयांना अभिमानास्पद कामगिरी यांनी केली आहे. अतिशय प्रतिकूल वातावरणात त्यांनी जी चढाई केली आहे त्याला कशाची तोड नाही. ३६० एक्स्प्लोरर च्या माध्यमातून अनेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. 
-आनंद बनसोडे, सीईओ, ३६० एक्स्प्लोरर  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news kilimanjaro the highest peak in africa anil vasave