विहिरीत मृतावस्‍थेत आढळला बिबट्या

दिनेश पवार
Friday, 12 February 2021

शहादा तालुक्यातील वडगाव येथील चिंचपाणी वनपट्टा क्षेत्रात बिबट्याचा गेल्या महिनाभरापासून वावर होता. काहींना तर बिबट्या प्रत्यक्ष नजरेस देखील पडला होता.

मंदाणे (नंदुरबार) : वडगाव (ता. शहादा) शिवारात वनपट्टा क्षेत्रातील एका विहिरीत बिबट्या पडल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत बिबट्यावर घटनास्थळीच पंचनामा करून शवविच्छेदन करत गावकऱ्यांच्या मदतीने अंतिम सोपस्कार पार पाडण्यात आले.

मृत बिबट्याचा अहवाल धुळे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आली; अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
बिबट्या मृत झाल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली असता वनविभागाचे वनक्षेत्र अधिकारी सचिन खुणे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले व मृत बिबट्याला ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. शहादा तालुक्यातील वडगाव येथील चिंचपाणी वनपट्टा क्षेत्रात बिबट्याचा गेल्या महिनाभरापासून वावर होता. काहींना तर बिबट्या प्रत्यक्ष नजरेस देखील पडला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु गुरुवारी (11 फेब्रुवारी) एका शेतकऱ्याला बिबट्या मृत अवस्थेत विहिरीत दिसून आला. संबंधित शेतकऱ्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने याबाबत वनविभागाला माहिती दिली. 

बिबट्याचा मृत्‍यू नेमका कशामुळे?
वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्‍थळी पोहचले व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढण्यात आले. मृत बिबट्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाकडून आलेले डॉ. पाठक यांनी पंचनामा केला. त्यानंतर घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात येऊन बिबट्यावर घटनास्थळीच्या परिसरातच अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी बिबट्याचा घातपात झाला की काय? असा संशय देखील व्यक्त केला जात असल्याने त्याबाबतचा अहवाल धुळे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. मृत बिबट्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होणार असल्‍याची माहिती वनक्षेत्र अधिकारी सचिन खुणे यांनी दिली.

पंचनाम्‍यानंतर अंत्‍यसंस्‍कार
यावेळी वनपाल बी. एल. राजपूत, एस. एस. देसले, एस. एस. इंदवे, वनरक्षक पी. के. बिरारे, वनरक्षक के. एम. पावरा, एस. जी. मुभाडे, आर. झेड. पावरा, वनकर्मचारी नईम मिर्झा, धर्मा चव्हाण व वनमजुर उपस्थित होते. बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्यावर घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी पं.स. सदस्य लगन पावरा, सरपंच रमेश पावरा, ग्रामविकास अधिकारी भागवत शिसोदे आदी उपस्‍थित होते.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news leopards in the well dead