esakal | मंदाणे आरोग्य केंद्रात दहा जागा रिक्त; कोरोना काळातही अनेक गैरसोय

बोलून बातमी शोधा

madane health center

मंदाणे आरोग्य केंद्रात दहा जागा रिक्त; कोरोना काळातही अनेक गैरसोय

sakal_logo
By
टिम इ सकाळ

मंदाणे (नंदुरबार) : मंदाणे (ता. शहादा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन रुग्ण तपासणी व उपचाराचा मोठा भार त्यातच कोरोना महामारीमुळे पडलेली भर, असे असताना तब्बल दहा कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडत असून, रुग्णांची गैरसोय होत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या बेजबाबदार व बेपर्वाईमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व संताप व्यक्त होत असून, वरील रिक्त जागा ताबडतोब भराव्यात, अशी मागणी होत आहे.

शहादा तालुक्याच्या पूर्व आदिवासी व ग्रामीण भागातील मध्य प्रदेश सीमेलगत असलेले मंदाणे हे मध्यवर्ती व मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. या गावाशी सुमारे ४० ते ४५ गावातील ग्रामस्थांची दैनंदिन बाजारहाट व अन्य कामांसाठी वर्दळ असते. या ठिकाणी स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित आहे. मात्र येथील अपूर्ण कर्मचारी संख्या पाहिल्यास आरोग्य केंद्राचेच आरोग्य धोक्यात आलेले दिसते. जमीनदोस्त झालेले वॉल कंपाउंड, शस्त्रक्रिया, इमारतीची पडझड, वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाची मोडकळीस आलेली इमारत, पाण्याची तीव्र समस्या, कर्मचाऱ्यांची कमतरता, शवविच्छेदनगृह फक्त नावालाच अशा विविध समस्या असून, या समस्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

रूग्‍णांची होतेय गैरसोय

मंदाणे आरोग्य केंद्रात दैनंदिन रुग्णांची संख्या मोठी असते. या भागातील शहाणे व वाघर्डे येथे स्वतंत्र आरोग्य केंद्र कार्यान्वित असले तरी या दोन्ही आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील गावे ही मंदाणे गावाच्या जवळपास असल्याने तेथील रुग्णांना मंदाणे आरोग्य केंद्रात येणे सोयीचे असल्याने याच आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी असते. मात्र या केंद्रात आस्थापनेवरील कर्मचारी संख्या अपूर्ण असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. केंद्रात औषधनिर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही दोन्ही पदे एक वर्षापासून रिक्त आहेत. त्यामुळे औषधी व गोळ्या वाटपाचे कामही वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेविकांना करावे लागते. रुग्णाचे रक्त व लघवी तपासणी कर्मचारीअभावी केली जात नसल्याने रुग्णांवर योग्य उपचार करण्यास अडचणी येतात. यामुळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद तातडीने भरणे गरजेचे आहे. तसेच मंदाणे आरोग्य उपकेंद्र क्रमांक एकमध्ये आरोग्य सेविका व एमपीडब्ल्यू दोन्ही पदे रिक्त आहेत. मंदाणे उपकेंद्र क्रमांक २ व असलोद उपकेंद्र या दोन्ही ठिकाणीही एमपीडब्ल्यू ही पदे रिक्त आहेत. याच आरोग्य केंद्रात शिपाई एक, सफाईगार एक, लिपिक एक तसेच आरोग्य केंद्रातील ओपीडीसाठीचे आरोग्यसेविकेचे पद रिक्त आहे. अशी एकूण तब्बल दहा पदे रिक्त असल्याने खूप गैरसोय होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांची तपासणी केल्यानंतर पुढील सर्व भार आरोग्यसेविकांवर येतो. त्यात रुग्णाला इंजेक्शन देणे, ड्रेसिंग करणे, गोळ्या-औषधे देणे, गावात विविध आरोग्य उपक्रम राबविणे अशी विविध कामे करणे आरोग्यसेविकांना अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे येथील सर्व पदे तातडीने भरली जावीत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाला येथील रिक्त जागा तातडीने भरण्यासंबंधी आदेशित करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.