
नंदुरबार : जिल्ह्यामध्ये एकूण ५६ हजार ११६ कृषिपंप वीजग्राहक असून, त्यांच्याकडे ७५४ कोटी वीजबिलांची थकबाकी आहे. त्यांपैकी निर्लेखनाद्वारे विलंब आकार व व्याजातील एकूण २६३ कोटी रुपये सूट दिली असून, ४९० कोटी सुधारित थकबाकीची रक्कम आहे. त्यांपैकी प्रथम वर्षी ५० टक्के रकमेचा म्हणजेच २४५ कोटींचा भरणा केल्यास उरलेल्या २४५ कोटींच्या रकमेत सूट मिळणार आहे.
ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२० जाहीर केले आहे. कृषिपंप ग्राहकांना ६०० मीटरपर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त अंतरावरील वीजजोडणीचा/सौरऊर्जा पंपाचा पर्याय उपलब्ध केला आहे. कृषिपंप ग्राहकास तत्काळ वीजजोडणी पाहिजे असल्यास ग्राहकाने स्वत: खर्च करण्याची मुभा असून, त्याचा परतावा वीजबिलाद्वारे होणार आहे.
तर दिवसा अखंडित वीज
कृषी ग्राहकांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पांची उभारणी होणार असून, यासाठी स्वतंत्र ऑनलाइन लॅन्ड बँक पोर्टल तयार केलेले आहे. यासाठी ३३/११ केव्ही उपकेंद्रापासून पाच किलोमीटरच्या परिघामध्ये शासकीय, गायरान किंवा खासगी जमीन उपलब्ध असल्यास तेथे सौर कृषी प्रकल्पाची उभारणी करून त्याद्वारे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा होणार आहे.
तीन वर्षांची सवलत
कृषिपंपाच्या वीजबिलातही सवलत देण्यात येत असून, त्यानुसार प्रथम वर्षी सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरल्यास वीजबिल कोरे करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र संबंधित कृषिपंप ग्राहकाला चालू बिल भरणे क्रमप्राप्त राहील. ग्राहकांना सुधारित थकबाकी भरण्यासाठी तीन वर्षांची सवलत दिली असून, या धोरणांतर्गत सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शक होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला आहे. १०० टक्के वीज वसुली असणाऱ्या रोहित्रांवर ग्राहकांना चालू वीजबिलावर १० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसेच थकबाकी नसणाऱ्या व नियमित वीजबिल भरणाऱ्या कृषी ग्राहकांना चालू वीजबिलावर अतिरिक्त ५ टक्के सवलत देणार आहे.
३३ टक्के रक्कम ग्रामपंचायतींना
संबंधित ग्रामपंचायतींतर्गत वसूल झालेल्या वीजबिलाच्या एकूण रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ८० कोटी ९३ लाख जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्येच कृषिपंप ग्राहकांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणांसाठी वापरली जाईल. कृषिपंप ग्राहकांना विद्युत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासन दर वर्षी एक हजार ५०० कोटी उपलब्ध करून देणार असून, तो निधी आणि ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर प्राप्त होणारा निधी मिळून कृषी आकस्मिक निधी (ACF) तयार करणार आहे. यातून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा करण्याचे नियोजन आहे. अकृषक ग्राहकांची वीजबिले भरण्याचीही सुविधा दिली आहे. त्यात वसुली कार्यक्षमतेनुसार ग्रामपंचायतींना २० टक्क्यांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे. तसेच ग्राम विद्युत व्यवस्थापक, गावपातळीवरील सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना वीजबिल वसुलीचे काम देणार असून, त्यांनाही प्रोत्साहनपर रक्कम देणार आहे. शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऊर्जा विभागाने केले आहे.
संपादन ः राजेश सोनवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.