esakal | बंदनंतर बाजारपेठेत गर्दी; गुढीपाडव्यानिमित्त किराणा

बोलून बातमी शोधा

nandurbar market

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाने उग्ररूप धारण केले आहे. त्यामुळे शासनासोबतच प्रशासनाने जिल्ह्यात १ ते १५ एप्रिल असे पंधरा दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्या काळात आठवड्यातील सोमवार ते बुधवार असे तीन दिवस केवळ नाशवंत वस्तू व भाजीपाला, किराणा दुकानांना दुपारी एकपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे.

बंदनंतर बाजारपेठेत गर्दी; गुढीपाडव्यानिमित्त किराणा

sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : एक एप्रिलपासून पंधरा दिवसांसाठी संचारबंदी लागू केली असली तरी आठवड्यातील गुरुवार ते रविवार हे शेवटचे चार दिवस जिल्हाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यू जाहीर केल्याने कडकडीत बंद पाळले होते. मात्र सोमवार (ता.१२)पासून तीन दिवस दुपारी एकपर्यंत भाजीपाला, किराणा व नाशवंत पदार्थ व वस्तू विक्रेत्यांना मुभा दिल्याने जिल्ह्यात खरेदीसाठी बाजारपेठेत एकच गर्दी उसळली. 
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाने उग्ररूप धारण केले आहे. त्यामुळे शासनासोबतच प्रशासनाने जिल्ह्यात १ ते १५ एप्रिल असे पंधरा दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्या काळात आठवड्यातील सोमवार ते बुधवार असे तीन दिवस केवळ नाशवंत वस्तू व भाजीपाला, किराणा दुकानांना दुपारी एकपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. मात्र त्यानंतर गुरुवार ते रविवार असे, चार दिवस कडकडीत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. त्यामुळे गेले चार दिवस बाजारपेठेत कडकडीत बंद पाळले. त्यानंतर आज आठवड्याचा पहिल्या दिवशी बाजारपेठ खुलली होती. त्यातच उद्या (ता.१३) साडे तीन मुर्हुतापैकीच एक मानला जाणारा गुढी पाडवा साजरा होत आहे. त्यानिमित्त घरोघरी गोड धोड अर्थात पुरणपोळी, आंब्याचा हंगाम असल्याने आंब्याचा रसाची मेजवानी असते. पक्वानासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत किराणा दुकानांवर महिला - पुरुषांची गर्दी झाली होती. काही ठिकाणी तर अक्षरशः रांगा लागल्या होत्या. तसेच आंबे विक्रेत्यांनीही मोठ्या प्रमाणात दुकाने थाटले होते. 

बाजारात आंबे
बजारपेठेत केसर, बदाम या वाणांचा आंबा जिकडे तिकडे विक्रीसाठी उपलब्ध होता. देवगड हापूस व लाल बदाम हेही विक्रीसाठी उपलब्ध होते. हापूस ३०० रुपये, लाल बदाम २०० ते केसर बदाम १५० रुपये प्रती किलो दराने विक्री झाले. आंब्याच्या हंगामाची सुरवात व गुढी पाडवा सणाचे आगमन होत असल्याने आंब्याचा रस बनविला जातो. म्हणून आंबे खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. तसेच भाजीपाला, लिंबू, आलं, कोथिंबीर खरेदीवरही सर्वाधिक भर होता. कोथिंबीर आज चांगलाच भाव खाऊन गेली. 
 
दुकानांवर कारवाई 
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात भाजीपाला, नाशवंत वस्तू व किराणा दुकानांना एक वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास मुभा दिली होती. त्यामुळे पालिकेने स्वतंत्र पथके तयार करून आदेशात मुभा नसलेल्या विक्रेत्यांनी दुकाने उघडे दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून दुकानांना सील लावण्याची कारवाई केली. दुपारी एकपर्यंत हे पथक शहरात फिरत होते. काही ठिकाणी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर स्वतः फिरून नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत होते. 

संपादन- राजेश सोनवणे