शेतकऱ्याच्या सन्मानासाठी नवरदेवाची आगळीवेगळी वरात; वाहनावरील सजावटीमुळे सर्वत्र कौतुक

मुकेश पटेल
Saturday, 19 December 2020

विवाह सोहळा म्‍हटला म्‍हणजे प्रत्‍येक ठिकाणी काही वेगळे पाहण्यास मिळते. कधी वरांची मिरवणूक, तर कधी स्‍टेजचे डेकोरेशन पाहण्यासारखे असते. विशेष म्‍हणजे लग्‍न सोहळा आटोपल्‍यानंतर गाडीवर दुल्‍हन हम ले जाऐंगे असे नेहमीच पाहण्यास मिळते. पण शहादा तालुक्‍यातील डोंगरगाव येथील वराने नेलेल्‍या गाडी एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरली.

पुरुषोत्तमनगर (नंदुरबार) : शहादा तालुक्यातील डोंगरगांव येथील भूषण प्रेमसिंह सोलंकी या तरुणाचे जखाणे येथील मुलीसोबत लग्नविवाह 19 रोजी संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्यातील जखाणे येथे मुलीकडे विवाह असल्याने नवरदेव ज्या वाहनावर जाणार त्याची सजावट करण्यात आली. मात्र या गाडीवर केलेल्या सजावट आगळीवेगळी आणि लक्षवेधक ठरली. 

शेतकऱ्याच्या सन्मानासाठी
हल्‍लीच्या काळात हौस म्‍हणून नवरदेव लग्नासाठी चक्क हेलीकॉप्टरने जाऊन त्यात नवरी मुलीला आणत असतो. पण डोंगरगाव येथील बी.ए.चे शिक्षण पुर्ण केलेल्या उच्चशिक्षित तरुणाने नवरदेवाच्या गाडीवर ‘बागायदार शेतकरी राजा’ नाव लावले आहे. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी नवरदेव भुषण सोलंकीने हे नाव लिहिल्याचे सांगण्यात येत आहे. भुषणने केलेल्या "बागायतदार शेतकरी राजा" अफलातून वाहनाच्या सजावटीमुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

वावर है तो पावर है...
लग्नासाठी बाशिंग बांधून सजून नवरदेवाचा रुबाब आपण सर्वत्र बघतो. लग्नपत्रिकेत नवरदेवाचे शिक्षण अवर्जुन टाकले जाते. आपल्या देशात नवरीला घेण्यासाठी कधी हेलीकॉप्टर घेऊन गेल्याचे बघितले किंवा ऐकले आहे. पण याच आपल्या कृषीप्रधान देशात कधीच जास्त शेतकरी राजा असल्याचा रुबाब दिसला नाही. डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक अशा अनेक उच्च शिक्षीत व्यक्तींची वाहवाही केली जाते. पण शेतकरी मुलाचे किंवा शेती असलेल्या मुलाला कोणीही विचारत सुध्दा नाही. वावर आहे तर पावर आहे हे आपण सर्वत्र ऐकत असतो; मात्र याची वाहवाही कोणी करतांना दिसत नाही. पण लग्नासाठी निघालेल्या नवरदेवाने चक्क आपल्या गाडीवर "बागायदार शेतकरी राजा" नाव लावून शेतकऱ्यांचे गर्वाने मान सन्मान वाढवला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news marriage navradeva van farmer name