अर्थसंकल्पातील तरतुदींचा नंदुरबार जिल्ह्यालाही लाभ : डॉ. हीना गावित 

धनराज माळी
Sunday, 21 February 2021

केंद्रीय अर्थसंकल्प जनहिताचा कसा आहे, याबाबत त्या म्हणाल्या, की केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. कोरोना महामारीत आर्थिक संकटाचा सामना करावा लागल्याने काही वस्तूंवर कर लागणे स्वाभाविक होते.

नंदुरबार : केंद्रीय अर्थसंकल्प बालकांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वसमावेशक, सर्वांच्‍या हिताचा असणारा अर्थसंकल्प असल्याचा दावा करीत जिल्ह्याला यातून एक क्रिटिकेअर हॉस्पिटल, एक सैनिकी शाळा, एक मेगा टेक्सटाइल पार्कसह विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याची माहिती खासदार डॉ. हीना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
नुकताच जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प जनहिताचा कसा आहे, याबाबत त्या म्हणाल्या, की केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. कोरोना महामारीत आर्थिक संकटाचा सामना करावा लागल्याने काही वस्तूंवर कर लागणे स्वाभाविक होते. जिल्ह्यातील ९० हजार कुटुंबांना अद्यापही गॅस मिळाला नसल्याने उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस मिळणार आहे. त्यासाठीचे पोर्टल सुरू झाले असून, लाभार्थींनी आवश्यक कागदपंत्रासह अर्ज भरावा म्हणजे उज्ज्वला योजनेचा लाभ मिळेल. 

नंदुरबारमधील ५७ हजार कुटूंबांना त्‍या योजनेचा लाभ
स्थलांतरित मजुरांना रोजगारासाठी परराज्यात गेल्यावर ते योजनांच्या लाभांपासून वंचित राहत होते. त्यामुळे ते जेथे असतील तेथे त्यांना लाभ घेता यावा म्हणून केंद्र शासनाने मजुरांसाठी ‘एक देश- एक शिधापत्रिका’ लागू केले आहे. त्या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील ५७ हजार कुटुंबांना लाभ मिळणार आहे. कामगारांसाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात येणार असून, यात नोंदणीनंतर सुविधांचा लाभ घेता येणार आहे. 

देशातील ६०२ रूग्‍णालयात नंदुरबारचा समावेश
देशातील ६०२ जिल्ह्यांसाठी क्रिटिकेअर हॉस्पिटल उभारण्यात येणार असून, यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच पोषण अभियान २.० नवीन योजनेंतर्गत आकांक्षित जिल्ह्यांमध्ये योजना राबविणार आहेत. तसेच देशात शंभर सैनिकी शाळा स्थापन होणार असून, यामध्ये नंदुरबारचाही समावेश आहे. मनमाड- इंदूर रेल्वे लाइनला गती मिळणार आहे. तर तीन मेगा टेक्सटाइल पार्क उभारणार असून, नंदुरबारला याचा लाभ मिळावा, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे खासदार डॉ. गावित यांनी सांगितले.  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news mp heena gavit budget