
साडेचारशे ते पाचशे कर्मचारी गेल्या आठवडाभरापासून नवापूर मध्ये मुक्कामी होते. साडेतीनशे कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. केवळ नंदुरबार जिल्ह्यातील ११० कर्मचारी थांबले आहेत. राज्यात सर्वांत मोठे कलिंग ऑपरेशन येथे सुरू आहे.
नवापूर (नंदुरबार) : नवापूर शहरात आठवडाभरापासून कलिंग ऑपरेशन सुरू आहे. बावीस पोल्ट्रीमध्ये जवळपास सहा लाख पक्षी व २५ लाख अंडी नष्ट करण्यात आले आहेत. यासाठी नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व अहमदनगर येथील पशुसंवर्धन विभागातील ९५ पथकामार्फत कलिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
साधारणतः साडेचारशे ते पाचशे कर्मचारी गेल्या आठवडाभरापासून नवापूर मध्ये मुक्कामी होते. साडेतीनशे कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. केवळ नंदुरबार जिल्ह्यातील ११० कर्मचारी थांबले आहेत. राज्यात सर्वांत मोठे कलिंग ऑपरेशन येथे सुरू आहे.
प्रभावीत चार पोल्ट्री फॉर्म
नवापूर तालुक्यातील बावीस पोल्ट्री फार्मच्या बर्डफ्लुबाधित कोंबड्यांचे सलग सातव्या दिवशी कलिंग करण्यात आले. शनिवारी (ता. १३) बर्डफ्लू प्रभावी चार पोल्ट्रीतील ६८ हजार ६८० कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले. यात गॅलेक्सी पोल्ट्रीतील २८ हजार ३४८, हुस्ना पोल्ट्रीतील १२ हजार ७२२, डॉन पोल्ट्रीतील १४ हजार ३२०, निशा पोल्ट्रीतील १२ हजार ८९० असे आज चार पोल्ट्रीमधील ६८ हजार ६८० पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत ५ लाख ७८ हजार ८९० पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. आज ६ लाख ३५ हजार ५४७ अंडी नष्ट केली एकूण २५ लाख १३ हजार ३९२ अंडी नष्ट केली. अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.
पाच पोल्ट्रीची अंडी नष्ट करणे थांबविले
नवापूर शहरातील पाच पोल्ट्रीतील पक्ष्यांचा अंडी नष्ट करण्याचे काम पुढील आदेश आल्यानंतर करण्यात येणार आहे. यामध्ये पॅरोनीयार पोल्ट्री २८ हजार पक्षी, पॅराडाईज ४ हजार ६००पक्षी, रीची सहा हजार पक्षी अशरफ पोल्ट्री १२ हजार पक्षी ,सेफ पोल्ट्री ७० हजार पक्षी या पाच पोल्ट्री मधील लाखो अंडी व पक्षी नष्ट करण्याची प्रक्रिया पुढील आदेशानुसार केली जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ उमेश पाटील यांनी दिली आहे.
पोलिसांचे उत्तम नियोजन
नवापूर परिसरातील २८ पोल्ट्री मधील आठवडाभरापासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कलिंग प्रक्रिया संपल्याने केवळ पशुखाद्य नष्ट करण्याचे काम आता राहिले आहे. रविवारपासून पोलिस बंदोबस्त काढण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली आहे. नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब भापकर यांचे उत्तम नियोजन दिसून आले. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पोल्ट्रीतील एक ही वस्तू अथवा पोल्ट्रीमध्ये बाहेरील वस्तू येऊ दिले नाही. चोख बंदोबस्त पोलिसांनी यावेळी केला. एवढेच नव्हे तर शेजारील गुजरात राज्यातील नेशनल पोल्ट्री येथे सुद्धा आठवडाभर सीमावर्ती भागात बर्ड फ्लू नियंत्रणासाठी खबरदारी घेण्यासाठी उपाययोजना करण्यात आली होती. सीमा तपासणी नाक्यावर देखील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो पोलिसांना तैनात करण्यात आले होते.
संपादन ः राजेश सोनवणे