घबाड सापडल्याची चर्चा अन्‌ नवापूरमध्ये दोन घरांची झडती 

विनायक सुर्यवंशी
Friday, 1 January 2021

कोट्यवधीचा सावकारी व्यवहार करणारे संबंधित विभागाच्या हिटलिस्टवर आहेत. शहरातील केवळ चार जणांकडे सावकारीचे परवाने आहेत. त्यापैकी तीन जणांनी परवाने नूतनीकरण केले आहेत.

नवापूर (नंदुरबार) : शहरातील दोन सावकारांच्या घरी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने गुरुवारी (ता. ३१) झडती घेतली. झडतीत मोठे घबाड हाती लागल्याची चर्चा आहे. सावकारीच्या तक्रारीवरून दोघांची गुरुवारी (ता. ३१) सकाळपासून ते सायंकाळी सहापर्यंत कसून चौकशी करण्यात आली. संशयित सावकाराच्या घरातून एक कट्टा, रोकड, महत्त्वाचे दस्तऐवज जमा केले आहेत. 
येथील चार तक्रारदारांनी संशयित सावकाराविरुद्ध तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने गुरुवारी कारवाई करण्यात आली. एकाने १२ लाख, दुसऱ्याने पाच लाख, तिसऱ्याने दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. दर महिन्याला दहा टक्क्यांनुसार व्याजाची रक्कम वसूल करीत होते. व्याजाची रक्कम देण्यास विलंब झाल्यास सावकाराकडून शिवीगाळ व ठार करण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली होती. 
या तक्रारीच्या आधारे जिल्हा उपनिबंधक प्रताप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख सहाय्यक उपनिबंधक रणजित पाटील, सहकार अधिकारी रत्ना मोरे, प्रकाश खैरनार, सुनंदा सामुद्रे, संगीता कोळी, कुणती पाडवी, हेमंत मरसाळे, शासकीय पंच सखाराम चौधरी, रुस्तम वसावे, किशोर पटेल आदींनी संशयितांच्या घराची झडती घेतली. संशयित सावकाराच्या घरातून एक कट्टा, रोकड, महत्त्वाचे दस्तऐवज जमा केले आहेत. पंचनामा करून संशयिताविरोधात नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाडवी यांनी दिली. 

शहरात रंगली चर्चा 
नवापूर शहरात एका आठवड्यात दोनवेळा तीन घरांची झाडाझडती घेण्यात आल्याने अवैध सावकारी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. शहरात कोट्यवधीचा सावकारी व्यवहार करणारे संबंधित विभागाच्या हिटलिस्टवर आहेत. शहरातील केवळ चार जणांकडे सावकारीचे परवाने आहेत. त्यापैकी तीन जणांनी परवाने नूतनीकरण केले आहेत. एकाचे बाकी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. नवापूर शहरासह नंदुरबार जिल्ह्यात शेकडो सावकारी कारभार करीत असल्याचे बोलले जात आहे. यावरही संबंधित विभागाने अंकुश लावणे गरजेचे आहे. 

जिल्ह्यात कोणी अवैध सावकारांनी शेतकरी किंवा नागरिकांना कर्ज दिले असेल, कर्जाच्‍या रकमेपेक्षा जास्त रकमेची मागणी करीत असेल, तर अशा सावकारांविरुद्ध नंदुरबार जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार करावी. 
-प्रताप पाडवी, प्रभारी जिल्‍हा उपनिबंधक, नंदुरबार 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news navapur city two home cheaking