रस्‍त्‍यावरची मोकाट गुरे पालिकेच्या प्रवेशद्वारावर येतात तेव्हा

विनायक सुर्यवंशी
Thursday, 24 December 2020

निवेदन वारंवार देऊनही पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. गुरुवारी रिपब्लिकन पक्षातर्फे मोकाट जनावरांना पालिकेच्या प्रवेशद्वाराला बांधून घोषणा देत आंदोलन केले.

नवापूर (नंदुरबार) : मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे मोकाट जनावरांना पालिकेच्या प्रवेशद्वाराला बांधून गुरुवारी (ता. २४) सकाळी ठिय्या आंदोलन केले. नगराध्यक्षांच्या लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेतले. मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत नगराळे यांनी सांगितले. 

हेपण वाचा-  मोठी बैलगाडी तयार करायला मिळेना म्हणून पोटासाठी बनविली छोटी बैलगाडी; आता महिन्याकाठी मिळतात ४५ हजार

नवापूर शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा, असे निवेदन वारंवार देऊनही पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. गुरुवारी रिपब्लिकन पक्षातर्फे मोकाट जनावरांना पालिकेच्या प्रवेशद्वाराला बांधून घोषणा देत आंदोलन केले. प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून घोषणा देत पदाधिकारी व कार्यकर्ते कलाल गल्लीमार्गे सरदार चौक समोरून येत पालिकेजवळ आले. सोबत मोकाट जनावरे होती. पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच घोषणा देत ठिय्या आंदोलन करण्यात आले. लेखी आश्वासन दिल्याशिवाय येथून उठणार नाही, असा पवित्रा घेतला. यामुळे वातावरण गंभीर बनले होते. पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अनिल सोनार, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण, मिलिंद भामरे उपस्थित होते. 

पंधरा दिवसात बंदोबस्‍त
नगराध्यक्ष हेमलता पाटील पालिकेत आल्यावर त्यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा करून लेखी आश्वासन दिले. पालिकेने कारवाई सुरू केली असून, येत्या १५ दिवसांत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येईल, असे नगराध्यक्षांनी लेखी आश्वासन दिले आहे. रिपब्लिकन पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष युवाध्यक्ष राहुल शिरसाठ यांनी मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या नवापूरकरांना होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली. माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, दिनेश नगराळे, नटू नगराळे, भटू नगराळे, सोहेब मिर्झा, प्रवीण तिरमली, रमीझ शेख, मुकेश गोसावी, सुनील राठोड, किरण झांझरे, अज्जू मक्राणी, राहुल सोनवणे, गोपी वाघ, संतोष तिरमली आदी या वेळी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news navapur palika cattle on road