
वर्षानुवर्षे डांबरीकरणामुळे रस्त्याची उंची वाढून जुनी घरे रस्त्याखाली गेली आहेत. पावसाचे पाणी घरात शिरते अशा समस्या मांडल्या. डांबरीकरण अत्यंत निकृष्ट होत असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल
नवापूर (नंदुरबार) : शहरातील प्रभाग सहा व सातमधील रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट होत असल्याचा आरोप करीत स्थानिकांनी हे काम बंद करण्याची मागणी केली आहे. नुकतेच डांबर टाकूनही रस्ता हाताने उखडत असल्याचे चित्रीकरण नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. तसेच स्थानिक नगरसेवक, नगराध्यक्षा व नगर पालिका प्रशासन यांच्या भूमिकेबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त करत तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन दिल्याने कुलकर्णी यांनी कुंभारवाडा रस्त्याची पाहणी करत रहिवाशांचे म्हणने ऐकून घेतले.
गुज्जर गल्ली, शिवाजी रोड, कुंभारवाड्यातील नागरिकांनी सदर रस्ता खोदून नव्याने डांबरीकरणाची मागणी केली. वर्षानुवर्षे डांबरीकरणामुळे रस्त्याची उंची वाढून जुनी घरे रस्त्याखाली गेली आहेत. पावसाचे पाणी घरात शिरते अशा समस्या मांडल्या. डांबरीकरण अत्यंत निकृष्ट होत असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होताच स्थानिक नगरसेवक, नगराध्यक्षा व पालिका प्रशासनाने कामाच्या ठिकाणी धाव घेत ठेकेदाराला सूचना देऊन नव्याने काम सुरू करून नागरिकांमधील वाढता रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. रस्त्याची गुणवत्ता राखली जाईल, असे नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी आश्वासित केले. मात्र स्थानिक नगरसेवक व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
धिक्काराची घोषणीबाजी; अधिकारी धारेवर
नवापूर पालिका हद्दीत सुरु असलेले कारपेट रोडचे काम तात्काळ थांबविण्याच्या मागणीचे निवेदन कुंभारवाडा येथील नागरीकांनी तहसिलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नगराध्यक्षा हेमलता पाटील यांना दिले. सकाळी अकराला पालिकेजवळ भाजपचे पदधिकारी व कुंभारवाडा भागातील रहिवाशांनी पालिकेच्या बांधकाम विभागाचा धिक्काराची घोषणीबाजी करत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांना बांगडयाचा आहेर देत निवेदन दिले. यावेळी भारतीय जनता पाटीचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, प्रदेश आदिवासी उपाध्यक्ष अनिल वसावे, जयंती अग्रवाल, हेमंत जाधव, शहर अध्यक्ष प्रणव सोनार, नगरसेवक महेंद्र दुसाने, निलेश प्रजापती, स्वप्निल मिस्ञी, घनशाम परमार, कमलेश छञीवाला, कुणाल दुसाने, अनिल सोनारसह रहिवासी उपस्थित होते.
शहरातील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम दिलेल्या निवेदनाप्रमाणे करीत आहोत. सर्वात आधी रस्त्याची सफाई करून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. थंडीचे दिवस असल्याने डांबर लगेच काढले तर निघून जाईल त्याला काही वेळ राहू द्यावे लागते. तीन प्रक्रियेत काम होणार आहे. रस्ता पाच इंच खोदून करणे निविदेत नाही.
- ईश्वर पाटील, ठेकेदार, नवापूर
रस्त्याच्या डांबरीकरणाचे दोन वर्षापुर्वी मंजूर जुन्या निविदाप्रमाणे काम केले जात आहे. त्यात बदल करायचा असेल तर नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करावी. नव्या पद्धतीने काम करणे आता शक्य नाही. चांगल्या दर्जाचे काम केले जाईल नागरिकांनी सहकार्य करावे.
- आरीफभाई बलेसरीया, बांधकाम सभापती, नवापूर
संपादन ः राजेश सोनवणे