
नवापूर गुजरात सीमेवरती असून लागून असलेला गुजरात राज्याचा तालुका उच्छल परिसरात वीस दिवसात अचानक दोन हजार कोंबड्या मारण्याची घटना घडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले.
नवापूर (नंदुरबार) : तालुक्यात बर्ड फ्लूचा धोका नाही. 2006 मध्ये आलेल्या बर्ड फ्ल्यू कुक्कुटपालन व्यवसायिकांना खुप काही शिकवून गेला. गेल्या चौदा वर्षांपासून आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत. तालुक्यातील कुक्कुटपालन व्यवसाय 2006 च्या तुलनेत फक्त चाळीस टक्केच सुरू आहे. सध्या तेरा ते चौदा पोल्ट्री फार्म कार्यरत आहेत. तालुक्यातील कुठल्याही पोल्ट्री फार्मवरील पक्षांना एच-5 , एन-1 ची लागण झालेली नाही. कुठलाही पक्षी या आजाराने बाधित नाही; तरी पशुवैद्यकीय विभागाशी सतत संपर्कात राहून योग्य ती काळजी घेत असल्याचे पोल्ट्री असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.
देशातील आठ ते दहा राज्यात बर्ड फ्लुचा धोका वाढला आहे. परभणी जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री उद्योग सुरू आहे. योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. याबाबत कुक्कुटपालन व्यवसाय करणारे चिंतेत आहेत. नागरिकांनी भितीने चिकन व अंडी खाण्यावर नियंत्रण केल्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. याबाबत प्रशासन व पोल्ट्रीवर संघाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
प्रशासनाने देखील याबाबत मदत करावी अशी अपेक्षा पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यानी केली आहे. देशातील सहा ते आठ राज्यात बर्ड फ्लु आला असला तरी राज्य सरकारकडून विशेष काळजी घेतली जात आहे. यात कुठेही पक्षांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला; तर जिल्हा प्रशासनाला काळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यात तेरा ते चौदा कुकूटपालन व्यवसाय सुरु आहेत. 2006 मध्ये बर्ड फ्लूची लागण झाली होती. तेव्हापासून कुक्कूटपालन व्यवसायिकांनी कोंबड्यांना एच-5, एन-1 ची लागण होऊ नये यासाठीही खबरदारी घेतली आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती कुठल्याही पक्षाला झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
गुजरातचा सीमेवर नवापूर
नवापूर गुजरात सीमेवरती असून लागून असलेला गुजरात राज्याचा तालुका उच्छल परिसरात वीस दिवसात अचानक दोन हजार कोंबड्या मारण्याची घटना घडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. मात्र याबाबत गुजरात प्रशासनाने कुठेही बर्ड फ्लूची लागण झाल्याची पुष्टी दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर नवापूर तालुक्यात प्रशासनाने पोल्ट्री व्यवसायिकांना योग्य त्या उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.
२००६ मध्ये ३५ पोल्ट्रीफॉर्म बंद
नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूची लागण 2006 मध्ये झाली होती. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सर्व पक्षी मारून बुजण्यात आले होते. त्यावेळेस तालुक्यातील तीस-पस्तीस कुक्कूटपालन व्यवसाय ठप्प झाले होते. त्यावेळेस तीस ते पस्तीस कोटीचे नुकसान झाले होते. त्यावेळचे मंत्री सुरुपसिंग नाईक यांच्या प्रयत्नामुळे शासनाने 20 कोटींची मदत दिली होती. परंतु सध्याच्या परिस्थितीत नवापूर तालुक्यात या आजाराची लागण नसली तरी लोकांनी घाबरून न जाता पक्षांची वेळोवेळी लसीकरण करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बर्ड फ्ल्यूचे प्रकार
बर्ड फ्लूचे बरेच प्रकार आहेत. 2006 मध्ये एच-5, एन -1 मानवाला संक्रमित करणारा प्रकार आढळून आला होता. मात्र यावेळेस कावळे, बदक आणि टीटवी यांच्यावर एच- 5, एन - 8 हा आजार झाल्याचे निदर्शनास आले आहे. याची तीव्रता कमी असते, हलक्या वजनाच्या पक्षाला याची लागण होते. कोंबड्या या वजनाने जड असतात त्यांना याची लागण होत नाही.
मानवात दिसणारी बर्ड फ्लूची लक्षणे
बर्ड फ्ल्यू झालेल्या कोंबड्या यांचे सेवन केल्याने मानवाला ताप, अतिसार, कफ, श्वसन समस्या, डोकेदुखी, स्नायू वेदना, घसा खवखवणे, वाहणारे नाक आणि अस्वस्थता वाटणे अशी लक्षणं आहेत. असे लक्षणे दिसताच वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
नवापूर तालुक्यात अद्याप कोंबड्यांना लक्षणे दिसून आलेली नाहीत. स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसून येत आहेत. याबाबत आमच्याकडे भोपाळला अहवाल आहे. परंतु भीतीमुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. याबाबत आम्ही काळजी घेत आहोत. पशुसंवर्धन विभागातील तज्ञांशी संपर्क आहे. आठवडाभर अति दक्षता घेत आहोत, जेणेकरून 2006 ची परिस्थिती उद्भवू नये अशी खबरदारी आम्ही घेत आहोत.
- आरीफभाई बलेसरिया, अध्यक्ष पोल्ट्री असोसिएशन नवापूर
संपादन ः राजेश सोनवणे