esakal | लाकूड तस्करांवर अंकुश कुणाचा; बहुतेक गुन्ह्यातील संशयित फरारच

बोलून बातमी शोधा

timber smugglers

अनेक वर्षांपासून सागवानी व सिसम लाकडांचा अवैध व्यवसाय सुरळीतपणे सुरू आहे. लाकडी फर्निचरचा व्यवसाय परवाना धारक व्यावसायिकांपेक्षा अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर होतो हे सर्वश्रुत आहे.

लाकूड तस्करांवर अंकुश कुणाचा; बहुतेक गुन्ह्यातील संशयित फरारच
sakal_logo
By
विनोद सूर्यवंशी

नवापूर (नंदुरबार) : तालुक्यातील वन विभागाच्या पथकाने आतापर्यंत केलेल्या लाकूड तस्करीचा इतिहास पाहिला तर विनापरवाना लाकडी फर्निचर व लाकडाची तस्करी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होतो, मात्र किती संशयितांना पकडले, किती जणांना शिक्षा अथवा कडक कारवाई झाली याबाबत प्रश्‍न चिन्ह आहे. त्यामुळे हा व्यवसाय सराईतपणे सुरू आहे. यावर अंकुश बसविण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे. 

तालुक्यात अनेक वर्षांपासून सागवानी व सिसम लाकडांचा अवैध व्यवसाय सुरळीतपणे सुरू आहे. लाकडी फर्निचरचा व्यवसाय परवाना धारक व्यावसायिकांपेक्षा अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर होतो हे सर्वश्रुत आहे. गुप्त माहिती वरूनच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी आतापावेतो कारवाई केली आहे. फर्निचर साहित्य तयार करणारे साधन, लाकूडसाठा, लाकूड वाहून नेणारे वाहन पकडण्यात येते मात्र लाकडाची तस्करी करणारे पकडले जात नाहीत. नेहमीच अंधाराचा फायदा घेऊन आरोपी फरार होतो कसा हा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही. 

महिन्याभरात तीन कारवाई 
बारी (ता. नवापूर) या गावात शनिवारी (ता. ९) वन विभागाला मिळालेल्या माहितीवरून तीन घरांवर छापा टाकला. त्यात साडेतीन घनमीटर सागवानी व सिसम लाकडाचा अवैध लाकुड साठ्यासह पलंग, दिवाण मिळून आले. एक ते दीड लाखाचा मुद्देमाल नवापूर वन विभागाच्या आगारात जमा करून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र संशयित सापडू शकला नाही. 
खोकसा (ता. नवापूर) गावात ७ एप्रिलला वनविभागाने दोन घरांमध्ये अवैध लाकूड फर्निचर कारखान्यावर छापा टाकत आठ लाखांचा लाकूड साठा व फर्निचर जप्त केले होते. घरातून सागवान नग, गोल व चौपट असे अंदाजे ८ घनमीटर मुद्देमाल पकडण्यात आला. रंधा मशीन, दोन डिजाईन मशीन मिळून आले. आठ लाखाचे लाकूडसाठा पाच सहा वाहनात भरून नवापूर वन विभागाच्या आगारात जमा केले. 

यापुर्वीही मुद्देमाल जप्त
दुधवे (ता. नवापूर) या गावात १४ मार्चला वन विभागाने चार घरांची झडती घेतली. त्यात सागवानी, सिसम जातीचे लाकूड अवैद्य रित्या साठवल्याचे आढळून आले. या कारवाईत आठ ते नऊ लाखाचा मुद्देमाल पकडण्यात आला होता. तालुक्यात अवैध फर्निचर तयार करून आंतर राज्यात तस्करी केली जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. मात्र या तिन्ही प्रकरणातील संशयित आरोपी अद्याप पकडलेले नाहीत. यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर संशय व्‍यक्‍त होत आहे. 

ठोस मोहिमेची गरज 
शेजारील गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात साग, सिसम, खैर, शिवण अशा मौल्यवान प्रजातीचे लाकूडतोड करून फर्निचर तयार करून इतर राज्यात रवाना केले जात असल्याचे मोठे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे. नवापुर तालुका महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असल्याने महाराष्ट्र गुजरात राज्यातील जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने महाराष्ट्र व गुजरात वन विभागाने संयुक्त कारवाई करून वन तस्करांवर ठोस मोहीम राबवण्याची गरज व्यक्त केली जात. 
 
संपादन- राजेश सोनवणे