esakal | गावागावांत दुःखाचे सावट; बहुसंख्य गावं पाडव्याच्या उत्साहाविनाच

बोलून बातमी शोधा

coronavirus
गावागावांत दुःखाचे सावट; बहुसंख्य गावं पाडव्याच्या उत्साहाविनाच
sakal_logo
By
राजेश सोनवणे

शहादा (नंदुरबार) : गत चार महिन्यांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यात मृत पावणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाचा भाऊ, कोणाची बहीण, तर कोणाचे नजीकचे नातेवाइकांचे या ना त्या कारणाने निधन झाले आहे. त्यातच आजच्या मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढीपाडव्याची गुढी उभारली जाते. सगळे कुटुंब आनंदाने सण साजरा करतात. परंतु यंदा अनेक गावांत या आनंदावर विरजण पडले असून, बहुसंख्य गावातील घरांमध्ये गुढीपाडव्याची गुढीच उभारलेली दिसून आली नाही. गावागावांत दुःखाचे सावट असल्याने यंदाचा गुढीपाडवा या सणालाही त्याची झालर दिसून आली.

गत वर्षापेक्षाही घातक असा स्ट्रेन असलेल्या कोरोनाचा प्रभाव तालुक्यात सर्वत्र आहे. कोरोनाच्या विस्‍फोटाने रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत. त्यातच त्यासाठीचे निर्णयही विलंबाने घेतले जात आहे. त्या मुळे रुग्णालये फुल झाल्याने बेडअभावी रुग्णांना धुळे, नाशिक, पुणे, सुरत, बडोदा, इंदोर आदी शहरांमध्ये उपचारासाठी न्यावे लागत आहे. शहरात ॲम्ब्युलन्सचा सायरन अहोरात्र ऐकायला मिळत आहे. खासगी रुग्णालयातील अवाढव्य खर्चही रुग्णाला वाचवू शकेल की नाही, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे.

अनेकांचा बळी

कोरोनाच्या या विक्राळ स्वरूपाने अनेक वृद्धांसह तरुणांचा बळी घेतला आहे. गत मार्चच्या ३१ दिवसांत फक्त शहाद्याच्या अमरधाममध्ये ६५ जणांवर अंत्यसंस्कार केले गेलेत. तर एप्रिलच्या ११ दिवसांत ६२ जणांवर अंत्यसंस्कार केले गेलेत. यात काही धर्म व समाजात दफनाची पद्धत असल्याने ती संख्या गृहीत धरल्यास कोरोनाची तीव्रता अधिक गडद असल्याचे दिसून येते.

आनंदावर विरजण

कोरोनाने अनेकांना नजीकच्या लोकांपासून पोरके केले आहे. कोणाची आई-आजी, कोणाचे वडील-आजोबा, कोणाचा भाऊ-काका, कोणाची बहीण-मावशी, कोणाची आत्या अशा सर्व अत्यंत नजीकच्या नातेवाइकांचे निधन या ना त्या कारणाने झाले आहे. चार महिन्यांपासून गावागावांत दुःखाचे सावट आहे. या मुळे आज मराठी नव वर्षाला प्रारंभ झाला. घराबाहेर गुढी व तोरण लावून गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण कोरोनाने तालुक्यातील बहुसंख्य गावातील घराच्या बाहेर गुढी व तोरणाला पारखे केले आहे. नजीकच्या कालावधीत जवळचे कोणी मृत झाले असल्यास सण साजरा केला जात नाही. कोरोनाने तर अनेकांना दुःखाच्या खाईतच ढकलले असल्याने पाडवा नावालाच साजरा झाला.