esakal | नंदुरबारची ‘ऑक्सिजन नर्स’ संकल्पना..राज्‍यभर राबविण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

बोलून बातमी शोधा

oxygen nurse
नंदुरबारची ‘ऑक्सिजन नर्स’ संकल्पना..राज्‍यभर राबविण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन
sakal_logo
By
टिम इ सकाळ

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन नर्स ही संकल्पना राबविण्यात आली असून, ५० रुग्णांसाठी एक नर्स नेमून तिच्या माध्यमातून ऑक्सिजन वापरावर लक्ष ठेवले जाते. ही संकल्पना यशस्वी झाल्याचे दिसत असून, अशा प्रकारचा प्रयोग अन्य रुग्णालयांनी राबवावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात सद्यःस्थितीत ऑक्सिजनची वानवा आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजन मिळणे दुरापास्त होत असताना नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दूरदृष्टी ठेवत तोकडी आरोग्य यंत्रणा असताना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दोन व शहाद्यातील कोविड केअर सेंटरलगत एक असे तीन हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केले आहेत.

जिल्‍हा स्‍वयंपुर्ण

या प्रकल्‍पांमुळे सद्यःस्थितीत जिल्ह्यातील रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या एकूण ऑक्सिजनपैकी ५० टक्के निकड यातून भागत आहे, तर येत्या काही दिवसांत नवापूर व तळोदा येथे ऑक्सिजन प्रकल्प प्रस्तावित असून, जिल्हा रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन जम्बो प्रकल्पाच्या निर्मितीला सुरवात झाल्याने मे महिन्यात जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील हवेतील ऑक्सिजन प्रकल्प राज्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे.

नियंत्रण ठेवण्यासाठी स्‍वतंत्र एक नर्स

ऑक्सिजन बेड वॉर्डमध्ये ऑक्सिजनवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र एक नर्स नियुक्त करण्यात आली आहे. ज्याच्यात ५० बेडमागे एक नर्स असणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा अपव्यय कमी होऊन त्याची बचत होणार आहे. या संकल्पनेची आरोग्यमंत्र्यांनी दखल घेत या प्रकल्पाबाबत प्रशासनाचे कौतुक केले आहे. तसेच या ऑक्सिजन नर्स संकल्पनेची अंमलबजावणी राज्यातील सर्वच जिल्ह्यांत करण्याचे आवाहन श्री. टोपे यांनी केले आहे.