
आगामी काळात राज्यातील सर्वांत मोठा पोलिसपाटलांचा मेळावा घेण्यात येणार असून लवकरच मुंबई येथे पोलिस पाटलांच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित आहे.
प्रकाशा (नंदुरबार) : पोलिसपाटील हा शासन आणि जनतेतला दुवा असून पोलिसांसह प्रशासनाला विविध कामांसोबतच कोरोना सारख्या महामारीत खांद्याला खांदा लावून अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या पोलिसपाटलाला पंधरा हजाराचे मानधन मिळावे. शिवाय कोरोना योद्धा म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना मृत झालेले पोलिसपाटलांच्या कुटुंबीयांना ५० लाखापर्यंत विमा कवच मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे पोलिसपाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी येथे केले.
प्रकाशा (ता. शहादा) येथील संत दगाजी महाराज सभागृहात शहादा तालुका पोलिसपाटील संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील पोलिसपाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे हे अध्यक्षस्थानी होते. नाशिक विभागीय अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष छोटू पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष बापू पाटील, शहादा तालुकाध्यक्ष गजेंद्र गोसावी, उपाध्यक्ष दीपक पाटील, दिलीप ठाकरे, सचिव सुरेशगिर गोसावी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले की, आगामी काळात राज्यातील सर्वांत मोठा पोलिसपाटलांचा मेळावा घेण्यात येणार असून लवकरच मुंबई येथे पोलिस पाटलांच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित आहे. बैठकीत विविध चर्चा होऊन आपल्याला नक्कीच न्याय मिळेल त्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत असे त्यांनी सांगितले. यावेळी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष बापू पाटील म्हणाले शासनस्तरावर विमा संरक्षण कवच मिळण्यासाठी सर्वांनी एकजूट प्रयत्न करूया.
तालुका अध्यक्ष गजेंद्र गोसावी, अक्कलकुवा, तळोदा, धडगाव, नवापूर, नंदुरबार येथील तालुकाध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करत विविध समस्या व प्रलंबित असलेल्या मार्गी लावण्याची मागणी केली. गजेंद्रगिर गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. नाशिक विभागीय अध्यक्ष पुरूषोत्तम पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलिसपाटील सखाराम शिंदे, प्रवीण पाटील, वैशाली पाटील, दिनेश पाटील, सुभाष भिल, सुनील भिल, मोहन रावताळे, गौतम खर्डे आदीसह पोलीस पाटील यांनी परिश्रम घेतले.
संपादन ः राजेश सोनवणे