अन्‌ संपुर्ण गावाचे शेतशिवारात पलायन; लग्‍नानंतर ८५ जण बाधित, स्वॅब देण्याची भीती

कमलेश पटेल
Monday, 1 March 2021

गावात सलग दोन दिवस लग्न सोहळा तसेच तिसऱ्या दिवशी १७ फेब्रुवारीला गावातील एका व्यक्तीचे निधन झाल्याने अंत्ययात्रेस ग्रामस्थांची गर्दी होती. यामुळे गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याची चर्चा आहे. 

शहादा (नंदुरबार) : गेल्या आठवड्यात करणखेडा (ता. शहादा) येथे विवाह सोहळा व अंत्यविधी कार्यक्रमांमुळे गावात सुमारे ८५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. यामुळे ग्रामस्थांचे स्वॅब घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आरोग्य विभागाकडून चार पथके व तीन मोबाईल व्हॅन २४ तास कार्यरत आहेत. दरम्यान, रविवारी (ता.२८) प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना स्वॅब देण्याविषयी आवाहन केले. या वेळी काही ग्रामस्थांनी घाबरून शेतशिवारात पलायन केले. 
करणखेडा (ता. शहादा) येथे कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपाययोजनांसाठी प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, शहादा तहसीलदार डॉ. मिलिंद कुळकर्णी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी, शहादा पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, म्हसावद, प्रकाशा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी गावात भेट देऊन उपाययोजनांसंबंधी आढावा घेऊन ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. विवाह सोहळा, अंत्ययात्रेस लोकांची गर्दी वाढू लागली आहे. करणखेडा गावात सलग दोन दिवस लग्न सोहळा तसेच तिसऱ्या दिवशी १७ फेब्रुवारीला गावातील एका व्यक्तीचे निधन झाल्याने अंत्ययात्रेस ग्रामस्थांची गर्दी होती. यामुळे गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याची चर्चा आहे. 

अन्‌ पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण वाढले
आरोग्य पथकातर्फे पहिल्या दिवशी ५४ ग्रामस्थांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी १२ ग्रामस्थ पॉझिटिव्ह आले. तसेच दुसऱ्या दिवशी ६४ ग्रामस्थांचे नमुने घेतले असता त्यात ३८ ग्रामस्थ पॉझिटिव्ह आढळले. तिसऱ्या दिवशी पुन्हा ३६ ग्रामस्थ पॉझिटिव्ह आढळल्याने या सगळ्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. करणखेडा गावात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने रविवारी (ता. २८) महसूल, पोलिस व पंचायत समिती, गटविकास अधिकारी, आरोग्य विभाग प्रशासनातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी गावात जाऊन पाहणी केली. या वेळी गावात आरोग्य विभागातील चार मोबाईल पथक २४ तास ग्रामस्थांचे स्वॅब घेण्यासाठी कार्यरत आहेत. 

गावात उपाययोजना
पॉझिटिव्ह निघालेल्या ग्रामस्थांपैकी चार व्यक्तींना नंदुरबार जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांनी दिली. या वेळी अधिकाऱ्यांसह करणखेडाचे सरपंच चुनीलाल पाटील यांनी गावात घरोघरी जाऊन महिला-पुरुषांना काळजी घेण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांनी घाबरू नये, मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. फिजिकल डिस्टन्स ठेवावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रांताधिकारी डॉ. गिरासे यांनी गावात प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनतेला औषधी फवारणी तसेच इतर उपाय योजनांसंबंधी मार्गदर्शन केले. 
 
प्रशासनातर्फे सर्वतोपरी उपाययोजना राबवण्यात येत आहे. शासन निर्देशाचे पालन होणे गरजेचे आहे. धार्मिक कार्यक्रम, लग्नसोहळे, अंत्ययात्रा या ठिकाणी गर्दी करू नये. आरोग्य विभागाला सहकार्य करून जनतेने स्वतःहून स्वॅब देण्यास पुढे यावे. 
- डॉ. चेतनसिंग गिरासे, प्रांताधिकारी, शहादा 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news shahada coronavirus one village positive case