वीजबिल न भरणाऱ्या २२ ग्राहकांचा पुरवठा खंडित 

कमलेश पटेल
Friday, 5 February 2021

वीज कंपनीशी अनेक ग्राहकांचे भ्रमणध्वनी नंबर नोंद झालेले असून, त्या सर्वांना विजेच्या थकीत असलेल्या बिलाच्या नोटिसा, एसएमएस पाठविले. दहा महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे वसुली मोहीम झाली नाही. थकीत वीजबिलांमुळे महावितरणला मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने वसुलीसाठी धडक मोहीम सुरू झाली आहे. 

शहादा (नंदुरबार) : येथील महावितरण वीज कंपनीची शहादा उपविभाग एकअंतर्गत २२ हजार ३२० ग्राहकांकडे एक कोटी ३२ हजार रुपयांची वीज बिलांची थकबाकी असल्याने संबंधित ग्राहकांना कंपनीने भ्रमणध्वनीद्वारे नोटिसा बजावल्या आहेत. पैसे भरण्याची ३० जानेवारी ही शेवटची मुदत दिली होती; परंतु ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे वीज कनेक्शन तोडण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. यात पाच दिवसांत २२ ग्राहकांचे वीज कनेक्शन कापले. 
शहादा तालुका वीज वितरण उपविभाग एकअंतर्गत सुमारे ७८ गावांत घरगुती कनेक्शनधारक २० हजार ७८० ग्राहक, एक हजार ३६० व्यावसायिक ग्राहक तसेच औद्योगिक २६० असे एकूण २२ हजार ३२० ग्राहक आहेत. यांच्याकडे सुमारे ११ कोटी ३२ हजार रुपयांची थकबाकी आहे. वीज कंपनीशी अनेक ग्राहकांचे भ्रमणध्वनी नंबर नोंद झालेले असून, त्या सर्वांना विजेच्या थकीत असलेल्या बिलाच्या नोटिसा, एसएमएस पाठविले. दहा महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे वसुली मोहीम झाली नाही. थकीत वीजबिलांमुळे महावितरणला मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने वसुलीसाठी धडक मोहीम सुरू झाली आहे. 

वीजबिल माफीची आशा
काहींनी थकीत वीजबिल माफ होईल, या आशेने अद्यापपर्यंत बिल भरणा केला नाही. वीजग्राहकांनी थकीत बिल त्वरित भरावे, वीज कनेक्शन कापण्याची वेळ महावितरणवर येऊ देऊ नये, वीजबिलाबाबत वैयक्तिक तक्रारी असल्यास ग्राहकांनी कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन केले आहे. 
 
महावितरणला मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. कोरोना विषाणूमुळे आठ ते दहा महिन्यांपासून अनेक ग्राहकांनी वीजबिल भरले नाही. ग्राहकांनी थकीत बिल त्वरित भरून वीज कनेक्शन तोडण्याचा प्रसंग महावितरणवर येऊ देऊ नये. 
-बी. व्ही. जगताप, उपकार्यकारी अभियंता, शहादा 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news shahada mahavitaran light connection cut