सरपंच आरक्षण अन् निवडीची उत्सुकता 

कमलेश पटेल
Wednesday, 20 January 2021

काही गावांत प्रस्थापितांना तरुणांनी धोबीपछाड दिला. काही ठिकाणी एका गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सरपंच पदाच्या निवडीवेळी घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहादा (नंदुरबार) : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या सदस्य निवडीचा कार्यक्रम सोमवार (ता. १८)च्या निकालानंतर पूर्ण झाला. गावागावांत विजयी उमेदवारांनी थोडक्यात का होईना जल्लोष केला. आता सरपंचपदाच्या निवडीचे सर्वांना वेध लागले असून, आरक्षण सोडतीच्या घोषणेची सर्वांना प्रतीक्षा आहे. आपल्या गावात कोणते आरक्षण निघेल आणि सरपंच कोण होणार, याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, तालुक्यात काही गावांत पूर्ण एका गटाला स्पष्ट बहुमत नसल्याने विजयानंतर लागलीच निवडून आलेल्या उमेदवारांना एकसंघ ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
शहादा तालुक्यात २७ ग्रामपंचायतींचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला होता. पैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने २१ ग्रामपंचायतींसाठी मोठ्या चुरशीने मतदान झाले. सोमवारच्या निकालानंतर ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती दिसून आली. काही गावांत प्रस्थापितांना तरुणांनी धोबीपछाड दिला. काही ठिकाणी एका गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सरपंच पदाच्या निवडीवेळी घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी चाणाक्ष राजकारण्यांनी आतापासूनच निवडलेल्या काही उमेदवारांना गळाला लावत देवदर्शनासाठी घेऊन गेल्याची चर्चाही तालुक्यात आहे. 

आता आरक्षण कार्यक्रमाची प्रतीक्षा
राज्य शासनाने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय मागे घेत सदस्यांमधूनच सरपंच निवडीचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीपूर्वी सरपंचपद आरक्षण जाहीर करून सोडतीही काढल्या; परंतु त्या रद्द करून निवडणुकीनंतर सोडतीचा निर्णय घेतला. त्यामुळे सरपंचपदाच्या नूतन आरक्षणाचा कार्यक्रम कधी जाहीर होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या महिनाअखेर सरपंच पदाच्या आरक्षण सोडत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही गावांतील चाणाक्ष राजकारण्यांनी दोन पंचवार्षिक निवडणुकीचा आरक्षणाचा अभ्यास करूनच संभाव्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. 
 
घोडेबाजाराची शक्यता 
निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक गावांमध्ये बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न झाले. परंतु परस्परांबद्दलचे हेवेदावे, सत्ता काबीज करण्याची असलेली ईर्षा यामुळे तब्बल २१ गावांमध्ये अखेर निवडणूक झाली. या निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद सर्वच नीतींचा वापर झाल्याचे चर्चिले जात आहे. दुरंगी व तिरंगी लढतीत आपलेच पॅनल निवडून येईल, असा दावा सर्वांकडून होता. परंतु काही ठिकाणी अपक्ष, तर काही ठिकाणी एका गटाला स्पष्ट बहुमत नसल्याने सरपंच पदाच्या निवडणुकीत घोडेबाजाराची शक्यता आहे. तसे होऊ नये म्हणून सर्वच गटप्रमुख नवनिर्वाचित सदस्य आपल्या गटापासून दुरावू नये, यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news shahada sarpanch reservation gram panchayat election