
जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू तालुक्यातला झाला होता. दरम्यानच्या काळात प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याने तसेच उपाययोजनांची त्यात भर पडल्याने गेले तीन महिने रुग्णसंख्या नगण्य झाली होती.
शहादा (नंदुरबार) : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संसर्ग वाढतच आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात तालुका हॉटस्पॉट ठरू पाहत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अधिकाधिक रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांचे विलगीकरण करण्यात येत असले तरी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शासन निर्देशाचे पालन करून वाढत्या संसर्गावर निकडीच्या उपाय म्हणून लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम यांसह विविध समारंभ आटोपशीर घेणे महत्त्वाचे आहे.
शहादा तालुक्यात सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आढळून आली होती. जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू तालुक्यातला झाला होता. दरम्यानच्या काळात प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याने तसेच उपाययोजनांची त्यात भर पडल्याने गेले तीन महिने रुग्णसंख्या नगण्य झाली होती. परंतु गेल्या महिन्याभरापासून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढत असून ती चिंतेची बाब ठरत आहे.
ग्रामिण भागात वाढती रुग्णसंख्या
दरम्यान ग्रामीण भागात रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात तालुक्यातील कलमाडी, तऱ्हाडी, जावदा आदी गावांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात वाढणारी रुग्ण संख्या चिंतेची बाब ठरत आहे .आरोग्य यंत्रणा गावात पथकामार्फत सर्वे करून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, तसेच हायरिस्क कॉन्टॅक्ट तपासणी वर भर असला तरी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणे गरजेचे आहे.
नवीन ट्रेड तर नाही ना..?
गेले काही महिने ग्रामीण भागात रुग्ण संख्या नगण्य होती परंतु अचानक एवढी रुग्ण संख्या वाढीचे नेमके कारण काय? कोरोनाचा नवीन ट्रेंड तर नाही ना? याचा शोध आरोग्य यंत्रणेने घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे तालुक्यात परदेशवारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच नाशिक, मुंबई, पुणे या मोठ्या शहरांशी नियमित संपर्क तसेच ये-जा सुरू असते,याचाही शोध आरोग्य यंत्रणेने घ्यावा. बाहेरून आलेल्यांची तपासणी करुन आवश्यक वाटल्यास विलगिकरनाचा सूचना देणे गरजेचे आहे.
दृष्टिक्षेपात शहादा तालुका....
संपूर्ण कोविड रुग्ण-- 3276
उपचार घेत असलेले-- 275
मृत्यू-- 66
बरे झालेले रुग्ण-- 2935
आजपर्यंत घेतलेले स्वॅब-- 13879
जिल्हाबाहेरून आलेले रुग्ण-- 53
हायरिस्क कॉन्टॅक्ट --11303
लोरिस्क कॉन्टॅक्ट -- 1850
संपादन ः राजेश सोनवणे