शहादाजवळ सव्वाचार लाखांचा गांजा जप्त 

कमलेश पटेल
Thursday, 24 December 2020

धडगाव येथून अमली पदार्थ सुका गांजाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचला होता. दरा फाट्यावर नाकाबंदी करण्यात आल्यानंतर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास धडगाव गावाकडून महिंद्रा गाडी वेगाने येताना दिसून आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी वाहन उभे करण्याचा इशारा दिला.

शहादा (नंदुरबार) : शहादा खेतीया रस्त्यावर दरा फाट्याजवळ नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे चार लाख २७ हजार ९४५ किमतीचा ६१ किलो सुका गांजा पकडला असून चारचाकी महिंद्रा कंपनीचा मॅक्स गाडीसह एकूण नऊ लाख २७ हजार ९४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यात दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. 

नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात (ता. २२) ला रात्री साडेआठला शहादा तालुक्यातील दरा फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोप्या डेमच्या पावरा (वय२५ रा. पिंप्री, ता. धडगाव) व विनोद भगवान चव्हाण (वय २१, रा. वडफळ्या, ता. धडगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. 

२८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त
धडगाव येथून अमली पदार्थ सुका गांजाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचला होता. दरा फाट्यावर नाकाबंदी करण्यात आल्यानंतर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास धडगाव गावाकडून महिंद्रा गाडी वेगाने येताना दिसून आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी वाहन उभे करण्याचा इशारा दिला. मात्र वाहन चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने गाडी पुढे नेल्यानंतर पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून गाडीला थांबवली असता संबंधितांनी उडवा उडविली उत्तरे दिली. तपासणी केली असता वाहनात असलेल्या प्लॅस्टिकच्या गोणीत चार लाख २७ हजार ९४५ रुपये किमतीचा ६१ किलो वजनाचा हिरवट रंगाचा सुका गांजा तसेच पाच लाख रुपये किमतीची एक महिंद्रा मॅक्स कंपनीचे वाहन क्रमांक (एम.एच.३९-०९१३)असा एकूण नऊ लाख २७ हजार ९४५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

यांनी केली कारवाई
या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास परिवीक्षाधीन पोलिस अधीक्षक एम. रमेश करीत आहेत. ही कारवाई नंदुरबार गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, दीपक गोरे, जितेंद्र अहिरराव, विशाल नागरे, बापू बागूल आदींच्या पथकाने केली.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news shahda hemp set police action